Mumbai News: मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रोजेक्टचं काम वेगानं सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रोजेक्टअंतर्गत गोरेगावमधील दादासाहेब फाळके फिल्म सिटी येथे 5.3 किलोमीटर लांबीचा तीन पदरी ट्विन (जुळा) बोगदा बांधला जात आहे. कामासाठी आवश्यक असलेल्या दोन अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन (TBM) पैकी एकाचे सर्व भाग साइटवर पोहोचले असून ऑगस्ट 2026 मध्ये प्रत्यक्ष उत्खनन सुरू झाल्यानंतर कामाला आणखी गती येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून हा प्रकल्प मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा मोठा रस्ता असणार आहे. यामुळे उत्तर मुंबईतील वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल.
ADVERTISEMENT
चार टप्प्यात विभागला गेला आहे
हा गोरेगाव-मुलुंड लिंक प्रोजेक्ट चार टप्प्यात विभागला गेला आहे. फेज 3 (B) मध्ये दादासाहेब फाळके फिल्म सिटी येथे 5.3 किलोमीटर लांबीचा तीन पदरी ट्विन (जुळा) टनल बांधला जात आहे. यासाठी आवश्यक असलेल्या लॉन्चिंग शाफ्ट (ज्या ठिकाणी बोगद्याच्या खोदकामाला सुरूवात होते) चं खोदकाम वेगानं सुरू आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच कामाची पाहणी करून यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी दादासाहेब फाळके फिल्म सिटी परिसरातील जोश मैदानाची पाहणी केली, त्या ठिकाणी अंडरग्राउंड ट्विन टनलच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन (टीबीएम) आवश्यक असतील. यापैकी एका मशीनचे सर्व भाग जोश मैदानात पोहोचले आहेत. हे भाग जपानमधून 77 कंटेनरमध्ये आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या मशीनचे भाग डिसेंबर 2025 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या मशीन्सच्या भागांचं कनेक्शन ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होईल, तसेच दुसऱ्या मशीनचं कनेक्शन ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, बोगद्याचं प्रत्यक्ष खोदकाम सुरू होणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय स्पर्धा आयोगात नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू... किती मिळेल पगार?
सर्वात मोठे बोगदे
हा तीन-लेन बॉक्स टनल (बोगदा) ची निर्मिती एक मोठं आव्हान असल्याचं सांगण्यात येत आहे. अंदाजे 5.3 किमी लांबीचे ट्विन बोगदे टनल बोरिंग मशीन वापरून खोदले जातील. बॉक्स बोगद्यासह, एकूण लांबी अंदाजे 6.62 किमी असणार आहे. तसेच, प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास अंदाजे 14.42 मीटर असेल. बोगद्यांचं हे काम पूर्ण झाल्यानंतर, हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे बोगदे असतील.
हे ही वाचा: घटस्फोटानंतर पतीने घरातील मांजरीसाठीही दिली पोटगी, तीन महिन्याला 10 हजार रुपये मोजणार; नेमकं प्रकरण काय?
मालाड ते ऐरोली थेट प्रवास
गोरेगाव-मुलुंड लिंक हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा मुख्य रस्ता असेल. यामुळे उत्तर मुंबईतील वाहतूक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा नवीन रस्ता विशेषतः दादासाहेब फाळके फिल्म सिटी आणि मुलुंड दरम्यान बांधला जाईल. पश्चिमेला असलेला मुंबई कोस्टल रोड, मालाड माइंडस्पेसद्वारे थेट ऐरोलीशी जोडला जाईल, यामुळे मालाड ते ऐरोली थेट प्रवास शक्य होणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











