Bacchu Kadu Marathi : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या पक्षाबाहेरच्या आमदारांपैकी एक होते आमदार बच्चू कडू. पण, याच बच्चू कडूंचा अपेक्षाभंग झाल्याचं दिसत आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांत वेगवेगळी विधानं करत नाराजी बोलून दाखवली असून, आता बच्चू कडू एक मोठी घोषणा करणार आहेत. त्यांनीच याबद्दल सूचक वक्तव्य केलं असून, कडू कोणता बॉम्ब टाकणार याची चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या बंडात सामील झाले. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर बच्चू कडू यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा कायम होत राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांना अपंग विभागाचे अध्यक्ष करून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे बच्चू कडूंचा पत्ता कटल्याचे म्हटले गेले.
वाचा >> Shiv Sena vs NCP: सुनील तटकरेंचं मोठं विधान, गोगावलेंसाठी ‘गुड न्यूज’; पण..
अजित पवारांच्या बंडानंतर बच्चू कडूंच्या मंत्री होण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बच्चू कडू चांगलेच अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू म्हणाले होते की, “खातेवाटपाचा गोंधळ सुरू असून आता तीन इंजिनचं सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार मजबूतही होऊ शकते किंवा त्यात बिघाडीही होऊ शकते. बिघाडा होऊ नये म्हणूनच बैठका सुरू आहेत. कुणाला कोणतं खातं द्यायचं, कोणता जिल्हा द्यायचा असे प्रश्न आहेत. दिसायला सोपं आहे. पण आतून पोखरलेलं असू शकतं.”
बच्चू कडू इतक्यावरच थांबले नाही, तर ते पुढे असंही म्हणाले, “आमदारांची नाराजी होणारंच, शेवटी पद आहे. सगळीकडे आनंद नाही, विरोधी पक्षातही नाही. सत्ताधारी पक्षातही नाही”, असं सांगत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
बच्चू कडू कुणाला देणार धक्का?
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलेला असतानाच आता बच्चू कडू धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यांनीच याबद्दल संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “कुणाचा फोन आला, कुणाचा नाही आला, यासंदर्भात मी सांगणार आहे. मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. पुढचा प्रवास कशा पद्धतीने करायचा, कसं सामोरं जायचं याचा निर्णय घेऊन मी जाहीर करेन.”
व्हिडीओ >> छगन भुजबळांविरोधात शरद पवारांचा ‘सातारा पॅटर्न’ काय?
एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे, त्यासाठी सगळ्यांना आमदारांना बोलवलं आहे. त्या बैठकीला जाणार का? असा प्रश्न कडू यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आता कुठे जाणार? आता जाणंच होणार नाही. मी सगळं सांगणार आहे. मी माझ्या जुन्या कार्यकर्त्यांशी फोनवरून चर्चा करतोय. माझा निर्णय सरकारला धक्का देणारा असेल की, मला धक्का असेल. ते लवकरच समजेल”, असंच सूचक भाष्य त्यांनी केले.
“माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा झालेली नाही. त्यांनीही माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मलाही वाटतं नाही की मी कुणासोबत चर्चा केली पाहिजे. मी नाराजीतून कुठलाही निर्णय घेत नाहीये”, असं बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे बच्चू कडू कोणता बॉम्ब टाकणार आणि कुणाला धक्का देणार? याची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT











