जालना : अंबड नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्यांदाच मतदान करण्याचा उत्साह मनात बाळगून पुण्यातून खास अंबडला पोहोचलेल्या तरुणाला मतदान करता न आल्याने संताप व्यक्त करावा लागला. आनंद शिंदे असे या तरुणाचे नाव असून प्रभाग क्रमांक 1 मधील बूथ क्रमांक 3 वर त्याच्या नावावर कोणी तरी दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यामुळे स्वतःच्या लोकशाही हक्कापासून दूर राहण्याची वेळ आल्याने तो निराश होत परत फिरला.
ADVERTISEMENT
आनंद शिंदे याने काय काय सांगितलं?
आनंद शिंदे सांगतो, “पुण्यात नोकरी करतो. पहिल्यांदा मतदान करणार म्हणून रात्रीच अंबडला आलो. पण केंद्रावर गेलो तर माझ्या नावावर आधीच मतदान झालंय. माझ्या हक्काचं मतदान मीच करत नाही आणि कुणीतरी दुसराच करतंय, हे खूप चुकीचं आहे.” या तरुणाचा संताप स्पष्ट दिसत होता. निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्याने केला. त्यामुळे संतप्त मनःस्थितीत त्याला मतदान न करताच माघारी परतावं लागलं.
हेही वाचा : रायगड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलावर बंदुक रोखली, सुशांत जबरेंना बेदम मारहाण
घटना समजताच स्थानिक नागरिकांमध्येही चर्चा रंगल्या. मतदार यादीतील त्रुटी, बूथवरील शिथिलता आणि ओळख पडताळणी प्रक्रियेतील दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पहिल्यांदाच मतदान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणाचा उत्साह अशा प्रकारे मावळल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मतदारांच्या नावावर दुसऱ्यांकडून मतदान होणं हा गंभीर प्रकार असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही होत आहे.
या पार्श्वभूमीवर अंबडसह जालन्यातील मतदानाची स्थिती पाहिली तर दुपारी 1.30 वाजेपर्यंत सरासरी मतदानाने समाधानकारक गती घेतली होती. जिल्ह्यातील प्रमुख नगरपरिषदांमधील मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे – भोकरदन 39.82%, अंबड 41.45%, तर परतूर 34.32%. एकूण जिल्हा मतदानाचा आकडा 38.22% वर पोहोचला आहे.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा आवाज महत्त्वाचा असतो. मात्र आनंद शिंदेसारख्या मतदाराला स्वतःचा हक्क बजावता न आल्याने निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी ओळख पडताळणी प्रक्रिया अधिक कडक करण्याची मागणी पुढे येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











