मुंबई तक
आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गुढी पाडवा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला.
गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधांमुळे गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवर बंदी होती.
मात्र, यंदा कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे आज सर्वत्र जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढी पाडव्यापासून होते. चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्षाची गणना होते.
पौराणिक कथांमध्ये असं म्हटलं आहे की, याच दिवशी ब्रम्हदेवाने ब्रम्हांडाची निर्मिती केली होती. त्यामुळे हिंदू धर्मात या सणाला अनन्य साधारण महत्व आहे.
गेली दोन वर्ष पाडवा जल्लोषात साजरा करता आला नव्हता. पण आज मुंबईसह विविध शहरांमध्ये अत्यंत जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आल्या.
यावेळी महिला वर्ग हा शोभायात्रेत अत्यंत हिरीरीने आणि नटून-थटून सहभागी झाल्या होत्या.
असंही म्हटलं जातं की, रावणाचा वध केल्यानंतर आजच्याच दिवशी भगवान राम हे अयोध्येला परतले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढी उभारण्यात आल्या होत्या. तेव्हापासून गुढीपाडवा सण हा साजरा केला जातो.
मुंबईतील गिरगाव, दादर, विलेपार्ले या मराठी बहुल भागात विशेषत: शोभायात्रांचा थाट काही औरच असतो.
याशिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि राज्यातील विविध शहरांमध्ये देखील शोभायात्रांचे आयोजन केले जाते.
यावेळी अनेक महिला आणि तरुणी पारंपारिक वेशभूषा करुन बाइकवर सवार झालेल्या पाहायला मिळतात.
मागील दोन वर्षापासून हा सगळा जल्लोष आणि आनंद एक प्रकारे हरपलाच होता. पण आता कोरोना निर्बंध हटविण्यात आल्याने तरुणाईच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.