'मला पुढे करुन तुमचा घाणेरडा अजेंडा रेटू नका', नीरज चोप्रा संतापला!

मुंबई तक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत गोल्ड मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या एका इंटरव्ह्यूमुळे तो खूपच चर्चेत आला आहे.

ऑलिम्पिक फायनलमध्ये नीरजसोबत पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीम देखील होता. त्याचविषयी एक वाद आता रंगला आहे.

मुलाखतीत नीरज म्हणाला होता की, 'फायनलला सुरुवात होण्याआधी मी माझा भाला शोधत होतो. तो मला सापडत नव्हता.'

'अचानक मी पाहिलं की, अरशद नदीम माझा भाला घेऊन फिरत होता.'

'मी त्याला म्हटलं, भाई हा माझा भाला आहे. तो मला दे. मला त्याने थ्रो करायचा आहे. तेव्हा त्याने तो मला परत केला.'

नीरजच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकं अरशदला ट्रोल करु लागले होते.

लोक आरोप करत आहेत की, फायनलच्या आधी अरशद नीरजच्या भाल्यासोबत छेडछाड करत होता.

या सगळ्या वादानंतर नीरजने याबाबत स्पष्टीकरण देताना ट्रोलर्संना चांगलंच सुनावलं आहे.

ट्विटरवर एक व्हीडिओ जारी करुन नीरज म्हणाला की, एका छोट्याशा गोष्टीचा लोकांनी खूपच मोठा मुद्दा बनवला.'

'थ्रो करण्याआधी प्रत्येकजण आपला भाला तिथे ठेवतो. अशावेळी कोणताही खेळाडून तिथून भाला घेऊन प्रॅक्टिस करु शकतो.'

नीरज म्हणाला की, हा एक नियम आहे. ज्यामध्ये काहाही चुकीचं नाही.

नीरज पुढे म्हणाला, 'मला या गोष्टीचं दु:ख आहे की, मला पुढे करुन काही जण त्यांचा घाणेरडा अजेंडा पुढे करत आहेत. माझी विनंती आहे, असं करु नका.'

'स्पोर्ट्स आम्हा सर्वांना एक होऊन खेळायला शिकवतं. आम्ही सर्व खेळाडू प्रेमाने राहतो. त्यामुळे कोणीही असं बोलू नये ज्यामुळे दुसरा दुखावला जाईल.'