Dombivli Gang Rape च्या निमित्ताने! सोशल मीडियामुळे सामाजिक चळवळींची धार बोथट?

सोशल मीडियावर व्यक्त झालं की संपलं आपलं कर्तव्य ही मानसिकता बळावत चालली आहे का?
Dombivli Gang Rape च्या निमित्ताने! सोशल मीडियामुळे सामाजिक चळवळींची धार बोथट?
फोटोइंडिया टुडे

काही दिवसांपूर्वीच सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेलं शहर डोंबिवली हादरलं ते बलात्काराच्या घटनेमुळे. एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी गेले आठ ते नऊ महिने विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकामागोग एक राजकीय प्रतिक्रिया आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे असं म्हटलं. चित्रा वाघ यांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाद मागितली.

मात्र मोर्चे किंवा आंदोलन झालं नाही... डोंबिवलीतल्या घटनेबद्दल सोशल मीडियावर म्हणजेच ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यावर अनेकजण व्यक्त झाले. मात्र जनतेचा राग, स्त्रियांचा, स्त्रीवादी संघटनांचा, समाजसेवी संस्थांचा हा राग हा रस्त्यावर दिसून आला नाही. सोशल मीडियावर व्यक्त झालं की झालं आपलं कर्तव्य अशी मानसिकता वाढत चालली आहे का? त्याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.

फोटो
फोटोAajtak

डोंबिवलीत घडलेली घटना धक्कादायक आहेच, त्यात काही शंकाच नाही. त्याआधी मुंबईतही अशीच एक घटना घडली होती. मुंबईत एका मुलीवर बलात्कार झाला, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला. त्यानंतर या मुलीला जखमी अवस्थेत घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात आणण्यात आलं या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी या प्रकरणाची तुलना झाली ती दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाशी. निर्भया प्रकरणावरून आठवलं की निर्भया प्रकरण हे देशात गाजलेलं शेवटचं असं प्रकरण होतं ज्यासाठी मोर्चे, आंदोलनं निघाली. त्यानंतर आठवून बघा.. आठवते आहे का देशव्यापी चळवळ?

2012 मध्ये निर्भया प्रकरण दिल्लीत घडलं त्यानंतर.. संपूर्ण देशात बलात्काऱ्यांना कठोर शासन झालंच पाहिजे या मागणीसाठी चळवळ उभी राहिली होती. मात्र निर्भया प्रकरण घडलं 2012 मध्ये त्यातल्या नराधमांना फाशी होण्यासाठी उजाडलं 2020 हे वर्ष. इतके दिवस निर्भयाच्या आई-वडिलांना न्यायासाठी वाट बघावीच लागली.

मात्र निर्भयाच्या घटनेनंतर आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे पीडीता समोर येऊन न्याय मागू लागल्या. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडू लागल्या. निर्भयानंतर मुंबईतलं शक्ती मिल बलात्कार प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर इतरही काही अशाच घटना उघडकीस आल्या. पण मग चळवळ झाली का? आंदोलन झालं का? तर याचं उत्तर नाही असंच आहे.

महाराष्ट्रातल्या राज्यव्यापी आंदोलनाचं उदाहरण द्यायचं झालंच ते तर ते कोपर्डी प्रकरणाचं देता येईल. कोपर्डीमध्ये जेव्हा एका पीडितेवर बलात्कार झाला तेव्हा राज्यात मोर्चे निघाले होते. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चांमध्येही या पीडितेला न्याय देण्याची मागणी झाली. मात्र डोंबिवलीसारख्या शहरात इतका मोठा प्रकार घडूनही आंदोलन किंवा मोर्चा पाहण्यास मिळाला नाही. स्त्रीवादी संघटना शांतच राहिलेल्या पाहण्यास मिळाल्या. राजकीय मोर्चे निघाले. मात्र राजकीय मुद्द्यासाठी कोणताही विषय चालतो. प्रश्न आहे तो सामाजिक भान जपण्याचा. स्त्रीवादी संघटनांनी ते जपलं का? तर याचं उत्तर दुर्दैवाने नाही असंच आहे.

फोटो सोशल मीडिया
फोटो सोशल मीडिया इंडिया टुडे

डोंबिवली गँग रेप प्रकरणामुळे महाराष्ट्राला 27 वर्षांपूर्वी घडलेल्या जळगाव सेक्स स्कँडलचीही आठवण झाली. या प्रकरणातही अशाच पद्धतीने अनेक मुलींना, महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे नग्न फोटो काढून त्यांच्यावर बलात्कार केला जात होता. या सेक्स स्कँडलमध्ये 300 ते 500 मुली/ महिला अडकल्या होत्या.

त्या काळात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी प्रकरणी ‘नारी समता मंचा’तर्फे अनेकदा जळगावचे दौरे केले. असंख्य पालक, विद्यार्थिनी, श्रोते यांच्यापुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, जळगावमधल्या मुलींबाबात जे घडलं ते आपल्या मुलींबाबत घडलं तर आपण कसे वागू? आपण तिला आधार देऊ का टाकून देऊ? बलात्कारानं स्त्री दुखावते, पण भ्रष्ट होत नाही हे आपण मानणार की नाही? योनिशुचितेचा आग्रह धरणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला आपण प्रतिप्रश्न करणार की नाही? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता. कारण लैंगिक अत्याचार बाईवर होतात आणि त्यात बाईलाच बदनाम केलं जातं, अत्याचार करणारे नराधम मात्र मोकाट उजळ माथ्याने जगू शकतात.अन्यायग्रस्त तरुणींशी बोलून अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी त्यांना धीर देण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं. या प्रकरणातला मुख्य आरोपी पंडित सपकाळे जेव्हा जळगावात आला होता तेव्हा हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. पंडित सकपाळेला जळगावात प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती, त्याचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला होता.

फोटो
Sakinaka Rape Case "मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता..." मनसे संतापली

डोंबिवली प्रकरणात मुख्य आरोपी विजय फुके आहे. हा विजय फुके नेमका कोण आहे? त्याची जात काय? त्याचं प्रोफाईल काय? तो कसा दिसतो हे अनेकांनी हे प्रकरण उघडकीस आल्यावर सोशल मीडिया आणि इंटरनेटवर शोधलं असेल. तसंच ही पीडिता नेमकी कोण हे शोधण्याचाही प्रयत्न केला असेल आपल्या परिने अंदाज लावले असतील. मात्र प्रश्न उरतो तो हाच की सोशल मीडिया आल्याने, त्यावर व्यक्त झाल्याने आंदोलनांची धार बोथट होत चालली आहे का?

बलात्कारासारखी धक्कादायक घटना घडली की फेसबुक पोस्ट टाकायची, ट्विट करायचं आणि आपल्या भावना व्यक्त करून मोकळं व्हायचं. यासाठीचा आटापिटा पाहण्यास मिळतो. पुढची घटना समोर आली की पुन्हा तेच. स्त्रीवादी संघटना कुठे आहेत? स्त्रियांचा आवाज बुलंद करणाऱ्या संघटना कुठे आहेत? कुणी म्हणेल की कोरोना असल्याने मोर्चे निघाले नसतील. जर राजकीय मोर्चे निघालेले, सभा झालेल्या चालत असतील तर मग स्त्रीवादी संघटनांनी का शांत बसावं? हा प्रश्न उरतोच.

भूमाता ब्रिगेड तृप्ती देसाई या महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करताना दिसल्या आहेत. डोंबिवलीतल्या घटनेबाबत त्यांनी त्यांच्या भूमाता ब्रिगेडने काही भाष्य का केलं नाही? तृप्ती देसाई या सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. पण त्यांची संघटना तर आवाज उठवू शकते ना? की त्यांच्याकडून ही अपेक्षाही समाजाने ठेवायची नाही? एरवी अनेक बाबतीत बोलणारे सामाजिक कार्यकर्ते, महिला समाजसेविका यांचाही आवाज बुलंद झालेला दिसला नाही. हे सगळे जण सोशल मीडियावरच व्यक्त होऊन मग शांत झालेले दिसले.

2014 नंतर देशभरात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम हे प्रचंड प्रमाणात वापरलं जातं आहे. पण त्यामुळे आंदोलनांची, मोर्चांची, स्त्रीवादी संघटनांची धार बोथट होताना, आक्रमकता संपताना दिसते आहे. विवेकाचा आवाज दाबता येणार नाही दाभोलकरांच्या खुन्यांना अटक झाली पाहिजे असं म्हणत दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आंदोलन करणाऱ्या अंनिसकडून या सगळ्यांनी पुन्हा प्रेरणा घेणं आवश्यक आहे. आपल्या देशातले शेतकरी मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडून स्त्रीवादी संघटनांनी प्रेरणा घेणं आवश्यक आहे.

फोटो
मुंबई सुन्न! बलात्कार पीडितेची मृत्युशी झुंज संपली; डॉक्टरांचे प्रयत्न ठरले अपयशी

बलात्कारीत स्त्रीकडे/ मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी या स्त्रीवादी संघटनांनी पुढे आलं पाहिजे. अशा मुली किंवा स्त्रिया यांचं पुनर्वसन करणं त्या समाजात पुन्हा एकदा त्यांचं आयुष्य सुरू करू शकतात हा विश्वास त्यांना देणं यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. घटना घडली की सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं आणि आपलं कर्तव्य संपवायचं ही तर सरळ सरळ पळवाट झाली. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे ही बाब चुकीचीच आहे असं म्हणता येणार नाही. मात्र जेव्हा प्रश्न गंभीर असतो आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ असते तेव्हा मात्र शांत बसता कामा नये.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चळवळ उभी करता येऊ शकते. #MeToo हे त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे. ही चळवळ सुरू झाल्यानंतर कितीतरी महिलांनी समोर येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. बदनामीच्या भीतीने स्त्री शांत राहात होती, तो काळ आता बदलला आहे. अन्यायाविरोधात चळवळ उभी केली जाणं, ती चळवळ व्यापक होणं हे खूप आवश्यक आहे. मात्र सध्या तरी ते तसं होताना दिसत नाही त्यामुळे सोशल मीडियामुळे चळवळींची धार बोथट होते आहे असंच म्हणावं लागेल.

Related Stories

No stories found.