BLOG : याला कारण एकच...आम्हाला पराभव सहन होत नाही !

मोहम्मद शमीला झालेल्या ट्रोलिंगनंतर फॅन म्हणून आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज
BLOG : याला कारण एकच...आम्हाला पराभव सहन होत नाही !

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधला नुकताच दुबई इथे पार पडला. १०० कोटी भारतीय लोकांना या सामन्याआधी विश्वास होता की नेहमीप्रमाणे भारतच या सामन्यात जिंकणार. परंतू प्रत्यक्ष सामन्यात फासे उलटे पडले आणि चित्र बदललं. बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाने थोडाथोडका नाही तर १० विकेट राखून टीम इंडियाला पराभवाचं पाणी पाजलं. वर्ल्डकप स्पर्धेतला भारताचा हा पहिलाच पराभव ठरला. ज्यावेळी भारतीय क्रिकेट संघ एखादा सामना हरतो आणि विशेषकरुन समोर प्रतिस्पर्धी पाकिस्तान असेल तर काय होतं हे सर्वांना माहिती आहे. खेळाडूंना शिव्याशाप, खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका आणि ट्रोलिंग.

या ट्रोलिंगचा शिकार ठरलाय तो म्हणजे भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी. पाकिस्तानविरुद्ध संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजी ही सुमार दर्जाची झाली. एकाही भारतीय गोलंदाजाला पाकिस्तानी फलंदाजांना अडचणीत आणता आलं नाही. परंतू पराभवामुळे मनं दुखावल्या गेलेल्या तथाकथित फॅन्सनी लक्ष्य केलं मोहम्मद शमीला. पाकिस्तानकडूनच खेळायचं होतं तर निळ्या रंगाची जर्सी घालून कशाला उतरलास अशा आशयाची एक कमेंट शमीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर करण्यात आली आणि यानंतर या गोष्टीला राजकीय वळण मिळत नवीन वादाला सुरुवात झाली.

BLOG : याला कारण एकच...आम्हाला पराभव सहन होत नाही !
Ind Vs PaK: मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना सेहवागने सुनावलं; औवेसीही भडकले

या सर्व गोष्टींचा नीट शांत डोक्याने विचार करायला गेलं तर यासाठी क्रिकेट फॅन म्हणून आपणच जबाबदार आहोत असं मला वाटतं. काहीही झालं तरी भारतीय संघाने सामना जिंकायलाच हवा. त्यात समोर पाकिस्तानचा संघ असेल तर मग दयामाया नाही...विजयच हवा. पराभव चालणार नाही अशी मानसिकता अनेक भारतीय फॅन्सची आहे. जर अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही आणि भारत सामना हरला तर मग मनातला राग काढण्यासाठी भारतीय फॅन्स एखादं सॉफ्ट टार्गेट शोधतात आणि त्याला आपलं लक्ष्य करतात. मोहम्मद शमीवर झालेली टीका हे त्याचचं लक्षण आहे.

या बाबतीत भारतीय क्रिकेटचे फॅन हे मला कायम दुटप्पी वाटत राहिले आहेत. निकाल चांगला लागला तर मोहम्मद शमी हा भारतीय ठरतो आणि निकाल वाईट लागला तर मोहम्मद शमी हा पाकिस्तानी ठरतो. आता असा विचार करुन बघा की पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात याच मोहम्मद शमीने जर भन्नाट बॉलिंग करुन पाकिस्तानी फलंदाजांची दांडी गुल केली असती आणि संघाला विजय मिळवून दिला असता तर भारतीय फॅन्स त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते. परंतू एका सामन्यातल्या खराब कामगिरीमुळे जर फॅन्सला मोहम्मद शमीच्या देशप्रेमाबद्दल आणि निष्ठेबद्दल जर शंका निर्माण होणार असेल तर ते सच्चे फॅन्स नाहीतच.

मोहम्मद शमी हा भारताचा जुना आणि अनुभवी गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने अनेक सामने आपल्या बॉलिंगच्या जोरावर भारताला जिंकवून दिलेत. परंतू एक सामना हरला की मोहम्मद शमीचा धर्म आपल्या आठवत असेल तर फॅन म्हणून आपण आपलंच आत्मपरीक्षण करायची गरज आहे. सर्वात साधी आणि सोपी गोष्ट म्हणजे की अशी की खेळाचं मैदान म्हटलं की जय-पराजय या गोष्टी आल्याच. पाकिस्तानविरुद्धचा पराभव आपल्याला मनाला एवढा का लागावा. तो देखील एक संघच आहे. त्या संघातही ११ खेळाडू असतात, ते देखील आपल्या खेळाडूंसारखेच सराव करुन, सामने खेळून इथपर्यंत आले आहेत.

काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने याबद्दल एक सुंदर स्पष्टीकरण दिलं होतं. २०१६ टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा धोनी म्हणाला होता, "पाकिस्तानविरुद्ध आम्ही जिंकलो याचा आम्हाला अभिमान आहेच. रेकॉर्ड अबाधित राहिला हे देखील चांगलंच झालं. परंतू प्रत्येकवेळी असंच होईल असं नाहीये. आज नाही तर उद्या, २ वर्षांनी, ५ वर्षांनी किंवा मग ५० वर्षांनी कधी ना कधी पाकिस्तान हा आपल्याला हरवणारच आहे." इतकी साधी गोष्ट आपल्याला फॅन म्हणून समजत नसेल तर मग आपण तो खेळ पाहण्याच्याही पात्रतेचे ठरत नाही.

या सर्व प्रकारात प्रसारमाध्यमांचाही तितकाच दोष आहे असं मला वाटतं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की त्याला खेळापेक्षा युद्धाचं रुप जास्त दिलं जातं. अग्नीपरीक्षा, हल्लाबोल, आर-पारची लढाई असे अनेक भारीभरकम शब्द आपण यादरम्यान टिव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो. त्यामुळे भारतीय फॅन सोडा मीडियाच सुरुवातीपासून भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकलाच पाहिजे असं वातावरण तयार करतो. मग या सामन्याआधीचा सर्व इतिहास, तुमचे खेळाडू आमच्या देशाबद्दल काय बोलले, असं झालं-तसं झालं असा सगळा इतिहास उकरुन बाहेर काढला जातो. प्रसारमाध्यम कधीही भारत-पाक सामन्यांचं सध्याच्या परिस्थितीनुसार विश्लेषण करत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांनाच भारत-पाकिस्तान हा खेळाचा सामना नसून युद्ध आहे असं भासवून दिलं जात असेल तर ते सो कॉल्ड युद्ध हरल्यानंतर असं ट्रोलिंग होणारच.

विजय कोणाला नको असतो?? प्रत्येक संघाला सामना जिंकायचा असतो. पाकिस्तानचा संघ आतापर्यंत आपल्याविरुद्ध वर्ल्डकपमध्ये हरत आलाय, त्यांनाही विजय हवाच असेल ना. त्या दिवशी पाकिस्तानचा संघ आपल्यापेक्षा वरचढ होता आणि पहिल्या बॉलपासून अखेरच्या बॉलपर्यंत भारताने सुमार खेळ केला एवढंच या पराभवामागचं विश्लेषण करता येईल, करायला हवं. दुर्दैवाने भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की त्याला हिंदू-मुस्लीम संघर्षाची किनार तयार करुन दिली जाते आणि या किनाऱ्यावरुन जर आपण सटकून खाली पडलो तर ते आपल्याला सहन होत नाही. कारण पाकिस्तानविरुद्ध आपण कधीच हरु शकत नाही हे आपल्याकडे बिबंवलं जातं. पाकिस्तानचा संघही कधी ना कधी आपल्याला मात देऊ शकतो ही समज जेव्हा भारतीय फॅन्समध्ये येईल तेव्हा असे ट्रोलिंगचे प्रकार थांबतील अशी आशा आहे.

यासाठी मीडियासह सर्व भारतीय फॅन्सला आपल्यात बदल करावे लागतील. भारत विरुद्ध पाकिस्तान हा एक खेळाचा सामना आहे ते दोन देशांमधलं युद्ध नाही हे चित्र आपल्याला जगासमोर आणि फॅन्ससमोर दाखवावं लागेल. पराभव झाल्यानंतर दुःख होणं साहजिकच आहे. परंतू हे दुःख व्यक्त करताना पक्त मोहम्मद शमीला टार्गेट करुन चालणार नाही. टीका करायची असेल तर त्या सामन्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक खेळाडूवर करा पण ती करतानाही पातळी सोडू नका. कारण याच शमीने जर न्यूझीलंडविरुद्धचा सामना आपल्याला जिंकवून दिला तर फॅन म्हणून बाहेर तोंड दाखवणं तुम्हा-आम्हाला जमणार नाही. संघ जिंकला तरीही आमचा आणि हरला तरीही आमचाच, मग खेळाडू हिंदू असो किंवा मुसलमान याने फरक पडत नाही. अंगावर भारताची जर्सी घातली की त्या क्षणापुरती धर्म-जातीची कुंडलं गळून पडायला हवीत. भारतीय म्हणून खेळ आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटप्रेमी चाहता मोठा आणि समृद्ध व्हायला हवा.

Related Stories

No stories found.