'मुंबई तक' वर्षपूर्ती विशेष: अनंत आमुची ध्येयासक्ती!!
Mumbai Tak

'मुंबई तक' वर्षपूर्ती विशेष: अनंत आमुची ध्येयासक्ती!!

Mumbai Tak: 'मुंबई तक'ने डिजिटल विश्वात आज (22 ऑगस्ट) एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. याच वर्षभराचा आढावा घेणारा एक विशेष लेख.

संपादक, मुंबई तक

डिजिटल विश्वात मुंबई तकचं आगमन होऊन वर्ष झालं! वर्षभराचा हा प्रवास सर्वार्थाने अत्यंत यशस्वी आणि समाधानकारक आहे. या यशामागे आहे मराठी मनाची भक्कम साथ. अवघ्या वर्षभरात मुंबई तकनं बातम्यांच्या विश्वात आपलं निर्विवाद वेगळेपण सिद्ध केलं. आज वर्षभरानंतर मागे वळून पाहतांना आमच्या डिजिटल प्रेक्षकांना धन्यवाद देत असतांनाच, थोडं सिंहावलोकनही करणं गरजेचं आहे.

मुंबई तकचा जन्मच मुळात आव्हानात्मक काळात झाला. सगळं जग कोविडचा मुकाबला करत असताना सगळ्यांसमोर नव-नवी आव्हानं होती. लॉकडाउन सुरू असताना ही आव्हानं प्रत्येक क्षेत्रात होती. सामान्य माणसापासून थेट सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणेपर्यंत तसंच व्यक्तिगत स्वरूपात असणारी आव्हानं ही मोठी होती.

मास्क, सॅनिटाईझर सोबतच वर्क फ्रॉम होम, डिजिटल शाळा, हे सगळं या न्यू नॉर्मलचा भाग झालं. एक जबाबदार माध्यम म्हणून मुंबई तकनं प्रत्येक बातमीवर फक्त नजरच नाही ठेवली तर वेळोवेळी प्रशासनाला जाब देखील विचारले. मग ग्रामीण रुग्णालयांची परिस्थिती, कोविड सेंटर मधली अनागोंदी , लसींचा तुटवडा किंवा शवांची अदलाबदल असो आम्ही या बातम्या फक्त आपल्यापर्यंत केवळ पोहचवल्या नाहीत तर त्यांचा योग्य पाठपुरावा केला.

राजकीय दृष्ट्या गेल्या वर्षभराचा काळही प्रचंड वेगवान घडामोडींचा होता. महाराष्ट्रात एका वेगळ्या राजकीय प्रयोगातून महाविकास आघाडीचं सरकार बनलं. त्यानंतर सहाच महिन्यात कोविडनं हातपाय पसरले. गेली काही वर्षे बिगर भाजप शाषित राज्यांत केंद्र विरुद्ध राज्य असा राजकीय संघर्ष बघायला मिळतोय.

महाराष्ट्र ही त्याला अपवाद नाही. उद्धव ठाकरे यांचं त्रिपक्षीय सरकार आणि समोर देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक नेतृत्वाखालील विरोधी पक्ष ! भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष या काळात दिसला. गृहमंत्री असेलेले अनिल देशमुख आणि वनमंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यातून दोघांना राजीनामा द्यावा लागला.

राजकीय बातमीदारी करताना मुंबई तकनं आपलं वेगळेपण सिद्ध केलं. टीव्ही पत्रकारितेत ज्या वेगाने बातम्या दिल्या जातात, तो वेग तर जपलाच पण, पण बातमी मागची बातमी आणि त्या बातमीचं सखोल विश्लेषणही आम्ही केलं.

भूमिका घेताना आम्ही कधीच मागे हटलो नाही. 'बिनधास्त, बेधडक' या आमच्या टॅग लाईन प्रमाणे आम्ही भूमिका घेतली, प्रश्न विचारले आणि रोखठोकपणे सत्याची बाजू मांडली, परिणामांची पर्वा न करता ! अभिनेत्री कंगना रनौतने तर मुंबई तकनं तिच्या दाव्याचा फॅक्ट चेक केला म्हणून थेट तुरुंगात टाकायची धमकी दिली. पण आम्ही मागे हटलो नाही, कारण आमची बाजू सत्याची होती.

'बिनधास्त, बेधडक', मुंबई तक!
'बिनधास्त, बेधडक', मुंबई तक!

बातमी मागची बातमी सांगताना तिची 'दुसरी बाजू' आपल्या समोर मांडत आहोत. बोजड भाषा, कठीण शब्द या कथित 'सादरीकरणाच्या' पलीकडे जाऊन आम्ही बातमीच्या दुसऱ्या बाजूचं विश्लेषण जितकं सखोल आणि अचूक केलं तितकंच प्रेक्षकाभिमुक आणि अभ्यासपूर्ण केलं.

राजकारण म्हणजे फक्त रुक्ष बातम्या, असं न ठेवता नव्या पिढीला माहीत नसलेले राजकारणातले इंटरेस्टिंग किस्से आम्ही सांगतो. प्रेक्षकांना- वाचकांना आम्ही कधीच गृहीत धरलं नाही, त्यांची नस कळते म्हणून त्यांच्या माथी फक्त आम्हाला वाटतं ते मारलं नाही. थेट प्रेक्षकांना आम्ही आमच्या चर्चेत सहभागी केलं.

लोकाभिमुख चर्चा करत असतानाच त्या तितक्याच पारदर्शी राहाव्यात हा आमचा प्रयत्न आपण यशस्वी केलात. प्रेक्षकांनी फक्त व्यवस्थेलाच नाही तर आम्हालाही प्रश्न विचारले, आम्हीही त्याची उत्तरं दिली. इंटरऍक्टिव्ह असण्यासोबतच मुंबई तकची पत्रकारिता ही लोकशाहीचा सन्मान करणारी पत्रकारिता आहे...

प्रेक्षकांना प्रत्येक बातमी ही क्लिष्ट स्वरूपात न सांगता, तिचा अर्थ आम्ही समजावून सांगितला. त्यामागचं कारण, प्रोसेस असे बारकावे समजावतो. व्हायरल जगातल्या बातम्या कधी हलक्या -फुलक्या स्वरूपात तर कधी त्यावर मार्मिक भाष्य करत मांडल्या.

क्रीडा जगातली बातमी , मैदानाबाहेरचे किस्से , चंदेरी दुनियेतल्या, वेब सिरीज च्या जगातल्या घडामोडीही तितक्याच उत्कृष्टपणे मुंबई तकने मांडल्या. सकाळच्या वृत्तपत्र आणि चहा सोबतच आता मुंबई तकचं सकाळचं ट्रेंडिंग बातम्यांचं बातमीपत्रही मराठी घराघरात पोहोचलं आहे!

'मुंबई तक'च्या माध्यमातून कधी आपल्या कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर तर कधी मोबाईल स्क्रीनवर दिसणाऱ्या टीम सोबतच पडद्यामागे काम करणारी एक भक्कम टीम आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचं योग्य भान असल्यासोबतच विचारांची पक्की बैठक असणारी संपादकीय टीम आहे. यासोबतच प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करून आपल्या समोर पोहचवणारी कॅमेरा टीम आणि त्याच्यावर संकलनाच्या माध्यमातून संस्कार करणारी एडिटिंग टीम देखील आहे.

पण आमच्या या टीमवर्क सोबतच सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय ती प्रेक्षकांनी ! डिजिटल माध्यम हे माध्यमांचं भविष्य आहे असं म्हणतात. पण डिजिटल माध्यम हे आता भविष्य न राहता, वर्तमान झालंय. लॉकडाउन च्या काळात प्रेक्षकांच्या बातमी बघण्याच्या सवयीत बदल झाला आहे.

आजचा प्रेक्षक जास्त सजग आहे, डिजिटलचा प्रेक्षक तर जरा जास्तच ! तो प्रश्न विचारतो, जे पटलं नाही ते थेट सांगतो , चुका असल्यास बिनधास्त दाखवतो. इथे त्यांना फक्त बातमी नकोय, न्यूज नकोय, व्ह्यूव्ज हवेत ! पत्रकार भूमिका घेत नाहीत असे आरोप केले जातात ,पण मुंबई तकने नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेतली आहे आणि या पुढेही घेत राहू !

देश एका वेगळ्या राजकीय सामाजिक अभिसरणातून जातोय. कधी जातीय तर कधी धार्मिक दुरावा बघायला मिळतोय. समाजमाध्यमं अर्थात सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, जितका पॉवरफुल सोशल मीडिया आहे,तितकाच डेंजरस !

मुंबई तक हे देशातल्या सर्वात अग्रणी अश्या इंडिया टुडे समूहाचं नवं अपत्य ! आमची बातमी वेबसाईट ,युट्यूब आणि इतर समाज माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचते. त्यामुळेच आमची जबाबदारी मोठी आहे. आणि आम्हाला त्याची कल्पना आहे.

Mumbai Tak
Maharashtra@61: मराठी तरूणाईच घडवेल नवा महाराष्ट्र

गेले वर्षभर आम्ही याच जबाबदारीचं भान ठेवून आपल्यापर्यंत आलो. आपणही भरभरून प्रेम दिलं , अवघ्या वर्षभरात मुंबई तकच्या सबस्क्राईबरचा परिवार हा सव्वा मिलियन (सव्वा बारा लाख) पर्यंत झाला आहे.

आम्ही आमच्या कामात कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा असंच लक्ष ठेवा आमच्यावर!

हा लोभ उत्तरोत्तर असाच वाढवा!

जय महाराष्ट्र !!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in