BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये 'फिनीक्स'भरारी

४१ वर्षांनी भारतीय हॉकीला संघाने ऑलिम्पिकमध्ये मिळवलं पदक, जर्मनीवर ५-४ ने मात
BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये 'फिनीक्स'भरारी

आज मनप्रीत सिंगच्या संघाने केलेल्या कामगिरीचं वर्णन शब्दांमध्ये करायला अनेकांना शब्दच सापडणार नाहीत. ज्या देशात हॉकी ही लोणच्याप्रमाणे चवीसारखी वापरली जाते त्या संघाने इतिहासाची नोंद केली आहे. तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमधला पदकांचा दुष्काळ संपवून भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलं आहे. मेजर ध्यानचंद यांच्या काळात आंतरराष्ट्रीय हॉकीवर भारताचं वर्चस्व असायचं. परंतू ८० नंतरच्या दशकात भारतीय हॉकीला उतरती कळा लागली. मध्यंतरी दुर्दैवाने भारतीय हॉकी ही चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असायची. परंतू या सर्व खडतर काळ मागे टाकत संघर्षातून भारतीय हॉकीचा फिनीक्स पक्षी पुन्हा एकादा भरारी घेण्यासाठी सज्ज झालाय.

टोकियोत सुवर्णपदकाची संधी हुकलेली असली तरीही कांस्यपदक आपल्या नावे करत भारतीय संघाने हॉकी अजुनही संपलेली नाही हे दाखवून दिलंय. आजचा विजय हा भारतीय हॉकी संघासाठी अनेक बाबतींमध्ये महत्वपूर्ण आहे. कांस्यपदकापर्यंत भारतीय संघाचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. संघर्ष आणि अनेक आव्हानांचा सामना करत भारतीय हॉकी संघ इथपर्यंत पोहचला आणि त्याने ही किमया करुन दाखवली.

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये 'फिनीक्स'भरारी
पदकांचा दुष्काळ संपला ! Tokyo Olympics मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक

२००८ सालचा काळ आहे...बिजींग ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ पात्र ठरु शकला नव्हता. त्यावेळी दिलीप तिर्कीचा मैदानावर हताशपणे बसलेला फोटो पेपरमध्ये आला होता आणि हेडलाईन होती...आता आम्हाला कशाचीच लाज वाटत नाही! असं म्हणतात की संकट येताना ही एकाच दिशेने येत नाहीत चारही बाजूंनी येतात. भारतीय हॉकी अशाच पद्धतीने निराशेच्या गर्तेत सापडली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी सोडा पण आशियाई उपखंडात पाकिस्तान आणि मलेशियाकडून मिळणारं आव्हान, संघटनात्कम राजकाणामुळे खेळाडूंना बसलेला फटका, घाऊक प्रमाणात प्रशिक्षकांची झालेली बदली आणि संघाच्या कामकाजात अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप या सर्व बाबींमध्ये भारतीय हॉकी बहरुच शकली नाही.

मध्यंतरी लंडन ऑलिम्पिकमध्ये आणि त्यानंतर रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकीसंघ पात्र ठरला. परंतू तिकडे फारशी कमाल दाखवणं त्यांना जमलं नाही. ज्यावेळी युरोपियन संघ दिवसागणिक आपल्या खेळात आणि खेळाच्या तंत्रात सुधारणा करत होते त्यावेळेला भारतीय हॉकी संघ या कारकुनी गोष्टींचा सामना करत होता. पॉल वॅन अस यांच्यापासून सुरु झालेला प्रशिक्षक बदल्यांचा सिलसिला नंतर रोलांट ओल्टमन्स, जोर्द मरीन, हरेंद्र सिंह, ग्रॅहम रिड असा चालूच राहिला. प्रत्येक स्पर्धेला नवीन प्रशिक्षक आणि नवीन संघ, त्यामुळे दुर्दैवाने कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघ स्थिरावलेला कधीच दिसला नाही.

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये 'फिनीक्स'भरारी
Tokyo Olympics 2020: एक असा विजय जो पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील!

महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघासाठी सर्वात सोपा रस्ता मानली जाणारी स्पर्धा म्हणजे Asian Games. परंतू २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत मलेशियाने सेमी फायनलमध्ये भारताला पराभूत करत मोठा उलटफेर केला. सोपी संधी हातातून गमावलेल्या भारतीय संघाला अखेरीस ऑलिम्पिक पात्रता फेरीवर आपली मदार ठेवावी लागली आणि भारताने कसंबसं का होईने टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. आता ऑलिम्पिकला पात्र ठरल्यानंतर पुढे पदकापर्यंत पोहचण्याचं आव्हान खरंच खडतर होतं. परंतू भारताने एका मोठ्या झटक्यानंतर ही बाब करुन दाखवली आणि इतिहासात आपली नोंद केली.

न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला १-७ असा पराभवाचा धक्का दिला. सर्वसाधारणपणे एवढ्या मोठ्या पराभवानंतर भारतीय हॉकी संघाने पुनरागमन केल्याची उदाहरणं फार कमी आहेत. परंतू कच न घाता भारतीय संघाने आधी स्पेनला नंतर अर्जेंटिनाला आणि उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला पराभवाचा धक्का दिला. उपांत्य फेरीत बेल्जिअमसोर भारताचं आव्हान टिकू शकलं नाही. परंतू कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीविरुद्ध भारताने केलेला खेळ हा खरंत काबिल ए तारीफ होता. संपूर्ण भारतीय संघ या विजयाचा दावेदार आहे. परंतू विशेषकरुन गोलकिपर पी.आर.श्रीजेश आणि बचावफळीत अमित रोहीदास यांनी केलेलं काम ही नक्कीच वाखणण्याजोगी आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारताने नंतरच्या सामन्यात आपल्या गोलपोस्टचा यशस्वीरित्या बचाव केला. श्रीजेशने अनुभवाच्या जोरावर अनेक आक्रमण परतवून लावली. परंतू युवा अमीत रोहिदासनेही तितकीच मोलाची भूमिका बजावत अनेक दिग्गज खेळाडूंचे फटके परतावून लावले. या दोन्ही खेळाडूंच्या अभेद्य बचावामुळे महत्वाच्या सामन्यांत भारताची गोलपोस्ट सुरक्षित राहिली. यासाठी ग्रॅहम रिड आणि त्यांच्या कोचिंग स्टाफचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. याव्यतिरीक्त गुरजंत सिंग, हार्दिक सिंग, सिमरनजीत सिंग यांच्यासारख्या तरुण खेळाडूंकडे लक्ष देऊन त्यांच्याकडून मैदानी गोलची रणनिती भारताने आखली, ज्याचा फायदा भारताला झालेला पहायला मिळाला.

भारतीय हॉकी संघाच्या विजयात आणखी एक मोलाचा वाटा म्हणावा लागेल तो म्हणजे ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा. ज्यावेळेला गरज होती त्यावेळी भारतीय हॉकी संघाला मुख्य प्रायोजकत्व देऊन ओडीशा सरकार हॉकीसंघाच्या पाठीमागे उभी राहिली. भुवनेश्वरमध्ये काही वर्षांपूर्वी झालेला विश्वचषक आणि अन्य महत्वाच्या स्पर्धा, खेळाडूंना सरावासाठी लागणारं सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि मैदानं ओडीशा सरकार आणि हॉकी इंडियाने उपलब्ध करुन दिली. भारतीय हॉकी संघाच्या पडत्या काळातही ओडीशा सरकार आणि नवी पटनाईक यांनी दिलेली भक्कम साथ ही कौतुकास्पद आहे. एखादा खेळ यशस्वी होण्यासाठी त्याच्यात गुंतवणूक महत्वाची असते. ओडीशा सरकारने हे सूत्र ओळखत भारतीय हॉकीत केलेली गुंतवणूकही महत्वाची आहे.

आता जाता, जाता प्रेक्षक म्हणून जबाबदारी ही आपली देखील आहे. भारतीय क्रीडाप्रेमींचं हॉकी प्रेम हे काहीसं बेगडी आहे. क्रिकेटवेड्या भारतदेशात क्रीडाप्रेमींना हॉकीची आठवण ही फक्त ऑलिम्पिक टू ऑलिम्पिक होते. भारतात अगदी दुबळ्या संघासोबत असलेला क्रिकेट सामना पाहणारे चाहते तुम्हाला सापडतील. परंतू प्रेक्षक म्हणून हाच वर्ग हॉकीमागे इतर स्पर्धांमध्ये भारतीय संघामागे उभा राहत नाही. सुलतान अझलन शहा, हॉकी चॅम्पिअन्स ट्रॉफी, एशियन चॅम्पिअनशीप अशा अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये हॉकी संघ चांगली कामगिरी करुन जातो. तेवढ्यापुरती त्याची चर्चा होते आणि मग सगळं प्रकरण बासनात....

क्रिकेट प्रमाणे हॉकीमध्ये अद्याप पैसा खुळखुळायला लागलेला नाही. अनेक सामन्यांचं थेट प्रक्षेपण भारतात केलं जात नाही, अशावेळी हॉकी ही भारतीय क्रीडाप्रेमींपर्यंत पोहचायला वेळ लागतो हे मान्य केलं तरी एरवी क्रिकेटच्या प्रेमापोटी सोशल मीडियावर जसं आपण व्यक्त होतो तसं हॉकीसाठीही प्रत्येक क्षणी व्यक्त होण्याची गरज आहे. या व्यक्त होण्यातून समोरच्या खेळाडूंना हुरुप मिळू शकतो. आपण एखाद्या स्पर्धेत खेळत असताना आपला विजय हा भारतातील लोकांना सुखावह ठरु शकतो हा विश्वास प्रेक्षक म्हणून आपण भारतीय हॉकीला द्यायला हवा. टोकियोमधल्या या पदकानंतर हे चित्र बदलेलं अशी आशा आहे. आता सुरुवात तर झालीच आहे, पण इथे न थांबता हॉकीने भविष्याचा विचार करुन पुढची पावलं टाकणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात हॉकी इंडिया आणि संबंधित संघटना ही पावलं टाकतील अशी आशा आहे.

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये 'फिनीक्स'भरारी
Tokyo Olympics 2020: 'हे' आहेत भारताचे ढाणे वाघ, ज्यांनी 41 वर्षानंतर भारतीय हॉकीला मिळवून दिलं पदक

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in