'जीवनात ही घडी अशीच राहू दे' म्हणत पद्मजा फेणाणींनी दिल्या लतादीदींना शुभेच्छा!

वाचा लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी लिहिलेला खास लेख

'जीवनात ही घडी अशीच राहू दे' म्हणत पद्मजा फेणाणींनी दिल्या लतादीदींना  शुभेच्छा!
फोटो सौजन्यपद्मजा फेणाणी जोगळेकर-फेसबुक पेज

पद्मजा फेणाणी-जोगळेकर

मी धसमुसळी! मला संगीतकार श्री.खळेंची H.M.V. मधील गाण्याची माझी रिहर्सल संपल्यासंपल्या पाच मिनिटं काही स्वस्थ बसवेना. तिथं दीदींचं आगमन झाल्याची कुणकुण काही वेळापूर्वीच कानावर आली होती. खळेही आत्ताच येतो म्हणून दीदींना भेटायला शेजारच्याच रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले.

मध्यान्हीची वेळ. गानसम्राज्ञीच्या दर्शनास आतुरलेल्या मीही हळूच दार किलकिलं करून अगदी छोट्याश्या फटीतून आत डोकावलं. (ते वयच होतं कोवळ्या उन्हाचं) आणि पहाते तो काय? ....... शुभ्र वस्त्र परिधान केलेली, प्रसन्न चेह-यावर झगझगणाऱ्या हि-यांची प्रभा पसरलेली, साक्षात सरस्वतीच! मी देहभान विसरून क्षणभर हे पाहते न् पाहते तोच --- दीदींच्या शोधक डोळ्यांनी हे टिपलं अन् “या ना आत” असं म्हणून दीदींनी मला मधुर साद घातली.

फोटो सौजन्य
फोटो सौजन्यपद्मजा फेणाणी जोगळेकर-फेसबुक पेज

मी हळूच चोरपावली आत शिरले. मला त्यांनी जवळ बसवलं. दीदी म्हणाल्या, “परवाच तुमचा ‘झरझर झरे श्रावण डोळा’ हा टी.व्ही.वरचा कार्यक्रम पाहिला. फार सुंदर गाता हो तुम्ही! ....” दीदी गातातही गोड आणि बोलतातही गोड! – जणू आवाज चांदण्याचे...

माझे कान आनंदाने बधीर झाले. हातपाय थंडगार पडले. अनपेक्षितपणे लतादीदी भेटाव्यात आणि पहिल्याच भेटीत माझ्या गाण्याचं त्यांनी मनापासून कौतुक करावं, मला कोण परमानंद झाला होता. माझा माझ्यावर विश्वासच बसेना. मी म्हटलं, “ छे हो दीदी, तुम्ही हे असं कौतुक करावं?” त्यावर त्या हसून म्हणाल्या, “मग काय झालं? एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराचं कौतुक करू नये, असं थोडंच आहे?”

खरोखरीच छप्पर फाडून देवानं मला माझ्या गानजीवनाच्या सुरुवातीलाच भक्कम, खंबीर आधार आणि प्रेमळ आशीर्वाद दिला. कधी एकदा हे घरी जाऊन सगळ्यांना सांगते असं झालं होतं. हे ऐकून आईनं माझी दृष्ट काढली आणि म्हणाली, “ जीवनात ही घडी अशीच राहू दे....!”

(पद्मजा फेणाणी जोगळेकर या प्रख्यात गायिका आहेत. ही पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लतादीदींसाठी लिहिली आहे)

Related Stories

No stories found.