पी.व्ही. नरसिंहराव : भारताचे पहिले ‘Accidental Prime Minister’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिद किडवई

वाये नादानी! मता-ए कारवाँ जाता रहाँ

कारवाँ के दिलसे एससास ए झिया जाता रहाँ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

-अल्लमा इक्बाल

भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना त्यांच्या मृत्यूनंतरही पक्ष कार्यालयापासून दूर ठेवण्यात आलं. एक काळ होता की ते या कार्यालयाचे प्रमुख होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचं निवासस्थान दिल्लीतल्या 9 मोतीलाल नेहरू मार्गावर होतं. 24 अकबर रोड या ठिकाणी काँग्रेसचं मुख्यालय आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचं निवासस्थान आणि काँग्रेसचं मुख्यालय यामध्ये अवघ्या 200 मीटर्सचं अंतर आहे. मात्र पी. व्ही. नरसिंहराव हे पक्षप्रमुख सोडल्यानंतरच्या आठ वर्षांच्या कालावधीत तिथे एकदाही गेले नाही. 1996 च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभावनंतर त्यांना पक्ष प्रमुख पद सोडावं लागलं होतं. 23 डिसेंबर 2004 ला पी. व्ही. नरसिंहराव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचं पार्थिवही त्या ठिकाणी ठेवण्यात आलं नव्हतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

24 डिसेंबर 2004 ला म्हणजेच पी. व्ही. नरसिंहराव यांचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनातून त्यांचं पार्थिव शरीर काही काळासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार होतं. त्याचा उद्देश हा होता की पक्षातले दिग्गज नेते इथे येऊन त्यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहतील. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा करणारे पंतप्रधान म्हणून त्यांचा लौकिक होता. मात्र त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आलं नाही. मुख्य दारातून ही गाडी आत जाऊ शकली नाही. तिथेच ही गाडी चाळीस मिनिटं होती, त्यावेळी माजी मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आणि इतर दिग्गजांनी पी. व्ही. नरसिंहराव यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार संजय बारू यांच्या म्हणण्यानुसार ‘ सोनिया गांधी यांनी अहमद पटेल यांच्यामार्फत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मुलाला निरोप पाठवला होता की त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिल्लीऐवजी हैदराबाद या ठिकाणी करता येतील’ संजय बारू हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे राजकीय सल्लागार होते.

सोनिया गांधी यांनी जो निरोप पाठवला होता त्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव यांचं पार्थिव दिल्लीहून विशेष विमानाने हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं. यावेळी सोनिया गांधी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमानात या पार्थिवासोबत कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, अशोक गहलोत, राज्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सगळेजण होते. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी एस. जयपाल रेड्डी, के. चंद्रशेखर राव, रेणुका चौधरी आणि पनाबाका लक्ष्मी यांचीही उपस्थिती होती.

पी. व्ही. नरसिंहराव हे त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये वाखाणले गेले ते त्यांच्या पंतप्रधान पदामुळे. ते एक कट्टर काँग्रेसी होते. सहा दशकं त्यांनी काँग्रेस वाढवण्याचं काम केलं. मात्र त्यांचा शेवट हा अशा प्रकारे झाला. अत्यंत सामान्य पद्धतीने त्यांचा शेवट झाला. 2004 मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एकदा यूपीएची सत्ता आली. मात्र नरसिंह राव यांना साईड ट्रॅक करण्यात आलं होतं ते 1996 पासून. 1996 मध्ये जेव्हा सत्ता गेली तेव्हा त्यांना आधी काँग्रेसच्या नेतेपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षअध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं. त्यानंतरची त्यांची आठ वर्षे त्यांनी आपला पक्ष काँग्रेस आणि भाजप यांना दोष दिला.

पी. व्ही. नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान असतानाच 1992 ला बाबरी मशिद पाडण्यात आली. त्यांच्या सत्तेवरचा हा सर्वात मोठा कलंक ठरला. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षातल्या म्हणजेच काँग्रेस पक्षातल्या लोकांवरही मला यासाठी बळीचा बकरा केलं जातं आहे असा आरोप केला होता. आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरलं. पी. व्ही. नरसिंह राव यांचं पुस्तक अयोध्या 6 डिसेंबर 1992 हे लिहिलं होतं. त्यांचं हे पुस्तक 2006 मध्ये म्हणजेच त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षांनी प्रकाशित झालं. यामध्येही त्यांनी बाबरी विध्वंसासाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. मंदिर उभारणीसाठी भाजपने वादाची मुहूर्तमेढ रोवली ती याच घटनेतून असाही उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.

पी. व्ही. नरसिंहराव यांचा पत्रिका, ज्योतिष या सगळ्यावर विश्वास होता. त्यांना वाटायचं की त्यांची जन्मपत्रिका म्हणजे त्यांच्यासाठी रोलर कोस्टरची एखादी राईड आहे. 1991 मध्ये त्यांनी त्यांचं सगळं सामान पॅक केलं, बॅगा भरल्या आणि ते आंध्रप्रदेशमध्ये त्यांचं जन्म स्थळ असलेल्या वारंगल येथे निघाले होते. मात्र नियतीच्या मनात वेगळं होतं.

21 मे 1991 या दिवशी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. एका स्फोटात त्यांचं सगळं शरीर उद्ध्वस्त झालं. या घटनेने सगळ्यांना स्तब्ध केलं. भारताच्या राजकारणात यामुळे एक मोठं शून्यच जणू निर्माण झालं. काँग्रेसमध्ये आता राजीव गांधींचा उत्तराधिकारी कोण? पुढे काय होणार हे सगळंच अस्पष्ट होतं. इंदिरा गांधी या जेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच राजीव गांधी यांना एक गोष्ट शिकवली होती.. ती गोष्ट होती की नेहरू गांधी परिवाराचं हित न पाहणाऱ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही, तसंच स्थानिक राजकारण करणाऱ्यांना काहीसं अंतरावरच ठेवायचं. मात्र पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे राजीव गांधी यांनी स्थानिक स्तरावर राजकारण करणाऱ्या, पक्ष वाढवणाऱ्यांना मोठं होऊ दिलं. त्याचा परिणाम असा झाला की राजीव गांधी यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर काही स्थानिक नेत्यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षा समोर आल्या. त्यापैकी एक होते ते महाराष्ट्रात यशस्वी राजकारण करणारे शरद पवार, दुसरे होते उत्तर प्रदेशातले ब्राह्मणांचं नेतृत्व करणारे नारायण दत्त तिवारी, तिसरे होते मध्यप्रदेशातले नेते अर्जुन सिंग. एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द उत्तमच होती. राजीव गांधी यांनी अर्जुन सिंग यांना पद सोडण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी थेट राजीव गांधींच्या विरोधातही दंड थोपटले होते. कोर्टाचं एक असं प्रकरण त्यांनी समोर आणलं ज्यामुळे राजीव गांधींना तडजोड करावी लागली. त्यानंतर राजीव गांधी यांनी गुलाम नबी आझाद, बुटा सिंग, जितेंद्र प्रसाद यांसारख्या नेत्यांना महत्त्वाची पदं दिली आणि त्यांचं महत्त्व वाढवलं.

राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतरच्या अठराच तासांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत बारा सदस्य होते. चार विशेष निमंत्रित सदस्य आणि दोन स्थायी सदस्य होते. 24 अकबर रोड या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला प्रमुख पद दिलं जावं हा ठराव झाला, त्यानंतर बैठकांचं सत्रही चाललं. पण या ठरावावर एकमत झालं नाही. शेवटी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांनी जे पंतप्रधान पदाच्या रेसमध्येही नव्हते अशा पी. व्ही. नरसिंहराव यांचं नाव सुचवलं आणि हे नाव सहजपणे स्वीकारलं गेलं कारण पी. व्ही. नरसिंहराव यांच्या इमेज भोवती कोणत्याही वादाचं वलय नव्हतं.

राजीव गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा नरसिंह राव तिथे हजर होते. तसंच राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचं निवासस्थान असलेल्या 10 जनपथवरही राव यांचं येणं-जाणं असे. नरसिंह राव आणि नटवर सिंग हे दोघेही इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि अफ्रिकन देशाच्या नेत्यांशी संपर्कात होते. 1980 ते 84 आणि 1988 ते 89 या कालावधीत नरसिंह राव यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केलं. त्यामुळे ते व्यक्तिगत रित्याही बाहेरील देशांमधल्या प्रतिनिधींना ओळखत होते. त्यांच्याशी ते चर्चाही करत असत. त्यामुळे ध्यानीमनी नसतानाही पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव निवडलं गेलं. ते सगळ्यांना मान्यही झालं.

22 मे 1991 ला काँग्रेसचं नेतृत्व करणार नाही असं सोनिया गांधी यांनी सांगितल्यानंतर पुन्हा एकदा CWC म्हणजेच काँग्रेस कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. 23 तारखेला अर्जुन सिंग हे आपल्या नावाचा प्रस्ताव देण्यासाठी उठले तेव्हा शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यावेळी नरसिंह राव हे शांत राहिले. पण त्यानंतर काही क्षणातच नरसिंह राव हे पक्षाचे अध्यक्ष असतील आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा झाली. पंतप्रधानपदी असताना म्हणजेच 1991 ते 96 या कालावधीत त्यांनी अनेक उतार-चढाव पाहिले. पण भारताचे पहिले Accidental Prime minister म्हणून त्यांचंच नाव घेता येईल. देशाचं नेतृत्व त्यांनी अशा वेळी केलं जेव्हा देश आर्थिक अडचणीत होता. नेहरू-गांधी परिवाराकडून देशाला ज्या अपेक्षा होत्या तशाच अपेक्षा पूर्ण करण्यात नरसिंहराव यशस्वी ठरले. आर्थिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांनी पंतप्रधान म्हणून महत्त्वाची पावलं उचलली. जगात भारताचं नाव घेतलं जावं आणि भारताने प्रगती करावी म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले. आपला कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला त्यावेळी जणू काही एका नव्या युगाची सुरूवात झाली हेच त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रीय राजकारणात त्यांचं नाव कायमच एक आदर्श पंतप्रधान म्हणून घेतलं जातं.

1991 मध्ये आपला देश आर्थिक अडचणींना सामोरा जात होता. त्यावेळी त्यांनी विश्वास दाखवला तो त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मनमोहन सिंग यांच्यावर. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री होते. मनमोहन सिंग यांचं अर्थविषयक ज्ञान, त्यांची धोरणं या सगळ्यावर पी. व्ही. नरसिंहराव यांनी विश्वास दाखवला त्यांना प्रोत्साहन दिलं. देशाची आर्थिक घडी सुधारण्यास पूर्णतः सहकार्य केलं. जग बदलतंय त्यामुळे देशालाही बदलावं लागेल या सिद्धातांवर त्यांनी विश्वास ठेवला.

2004 मध्ये यूपीएची सत्ता देशात पुन्हा आली त्यानंतर आठ महिन्यांमध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांचं निधन झालं. आपल्या आजारपणाच्या दिवसांमध्ये त्यांनी ही बाब मान्य केली होती की बाबरी विध्वंसाच्या घटनेमुळे आपल्या राजकीय प्रगतीला लगाम लागला. 2020 मध्ये सोनिया गांधी यांनी नरसिंहराव यांनी देशासाठी दिलेलं योगदान मान्य केलं. कारण राव यांचं सरकार असताना काँग्रेसने कशी प्रगती केली आणि देशाची आर्थिक घडी सुधरवण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले हे सोनिया गांधी यांनी स्वीकारलं.

पी. व्ही. नरसिंहराव हे आदर्श व्यक्ती होते, पंतप्रधान म्हणून त्यांनी जी कारकीर्द व्यतित केली त्याचा काँग्रेसला गर्व असणार आहे असंही सोनिया गांधी यांनी एका पत्रात नमूद केलं. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानपदी असलेल्या नरसिंह राव यांनी जे योगदान दिलं ते देश विसरणार नाही असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. एकीकडे नरसिंह राव यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना काँग्रेसमध्ये त्यांचं स्थानही पुन्हा त्यांना परत मिळालं असंच म्हणता येईल. कारण 1996 मध्ये सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत ते काहीसे दुर्लक्षितच राहिले. आता मात्र त्यांचं महत्त्व हे काँग्रेसला पटलं आहे हेही नसे थोडके!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT