धर्मेंद्र: रूपेरी पडदा व्यापून टाकणारा देशी मातीतला हीमॅन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंदी सिनेसृष्टीचा महानायक कोण? असा प्रश्न विचारला तर उत्तर पटकन येतं ते म्हणजे अमिताभ बच्चन. पण या महानायकाला घडवणारा कोण? हा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आहे धर्मेंद्र. हीमॅन म्हणजेच अॅक्शन हिरोची जी इमेज त्याने निर्माण केली त्याच्या जवळपासही कुणाला त्याचा काळ होता तोपर्यंत जाता आलं नव्हतं. शोले सिनेमात धर्मेंद्रच्या जागी विरू कुणी दुसरा असू शकतो याची कल्पनाही आपल्याला करवणार नाही. आज याच हीमॅनचा वाढदिवस. हा हीमॅन पडद्यावर आपली जादू दाखवत राहिला आणि त्या-त्या पिढ्यांना आपलंसं करत राहिला यात काहीही शंका नाही.

हॉलिवूडमध्ये जसा अरनॉल्ड त्याचा काळ गाजवत होता तसा आपल्याकडे आपल्या देशी मातीतला हिरो होता आणि आहे ज्याचं नाव आहे धर्मेंद्र. 1960 च्या दशकात तो आला. दिल भी तेरा हम भी तेरे, शोला और शबनम, अनपढ, शादी, बंदिनी, बेगाना, आयी मिलन की बेला, पुर्णिमा, फुल और पत्थर, देवर, अनुपमान, आये दिन बहार के या सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची जादू दाखवत राहिला. मेरा नाम जोकरमधला त्याने साकारलेला सर्कसचा मालक आठवा. यादो की बारात सिनेमातला शंकर आठवा. अजितच्या पायात 8 आणि 9 नंबरचा बूट पाहून चिडणारा. लहानपणी ताटातूट झालेल्या भावांची ओळख यादो की बारात निकली है आजमध्ये झाल्यानंतरचा शंकर, आपल्या भावांना, कुटुंबाला वाचवण्याची धडपड करणारा शंकर सगळ्यामध्ये धर्मेंद्र अगदी चपखल बसला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ड्रीम गर्ल, सीता और गीता, चुपके चुपके या सिनेमातल्या त्याच्या भूमिकाही खास गाजल्या. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादुरी, शर्मिला टागोर, ओमप्रकाश अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्रने त्याच्यात विनोदी अभिनेताही लपला आहे हे दाखवून दिलं. ऋषिकेश मुखर्जींचं दिग्दर्शन आणि इतक्या सगळ्या कलाकारांची फौज यात ओम प्रकाशची जिरवताना प्यारे मोहन बनून त्याने जी काही धमाल केली आहे ती केवळ अविस्मरणीय.

ADVERTISEMENT

राज कपूर, देवआनंद, दिलीप कुमार हे तिघेही आपला काळ गाजवत होते. त्यावेळीच त्यांना समांतर धर्मेंद्रही विविध भूमिका साकारत राहिला. त्याचा खास असा एक चाहता वर्ग तयार करत राहिला. त्याचं लोभस आणि साधं दिसणं हे त्या पिढीला, त्याचे सिनेमा बघणाऱ्यांना सगळ्यांनाच आवडलं. अर्थात अनेकांनी त्याच्यावर ठोकळा नट असा शिक्काही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सगळ्याची पर्वा न करता धर्मेंद्र आपल्या मनाला रूचेल तशी कामं करत हरहुन्नरीपण जपत राहिला हे कधीही नाकारता येणार नाही.

ADVERTISEMENT

शोले सिनेमात त्याने साकारलेला विरू तर त्याने अजरामर करून ठेवला आहे. शोलेबाबत बरेच किस्से ऐकले आहेत, त्यातला एक किस्सा धर्मेंद्रनेच एका मुलाखतीत सांगितला होता. अमिताभ बच्चनच्या जागी म्हणजेच जयच्या भूमिकेसाठी आधी शत्रुघ्न सिन्हाचा विचार होत होता. अमिताभचं नाव सुचवलं ते धर्मेंद्रनेच. शोलेला विरू मिळाला आणि सिनेसृष्टीला महानायक. मात्र हा महानायक शोधणारा माणूस काहीसा वंचित राहिला.

पुरस्कारांपासून वंचित राहिलेला नायक

विविध शेड्स असलेल्या भूमिका त्याने त्याच्या कारकिर्दीत साकारल्या पण तो वंचित राहिला तो बक्षीसापासून. त्याला नॉमिनेशन मिळालं पण बक्षीस मिळालं नाही. वाट्याला आले ते पुरस्कार कोणते होते? बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला घायल सिनेमाचा निर्माता म्हणून. 1997 ला मिळाला लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार. 1960 ते 2018 अशी जबरदस्त प्रदीर्घ सिनेकारकीर्द असूनही आपल्या वाटणाऱ्या धर्मेंद्रच्या वाट्याला पुरस्कार आले ते असेच. 2012 मध्ये सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीबाबत पद्मभूषण पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आलं. मात्र फिल्मफेअर किंवा अगदी सहाय्यक अभिनेता म्हणूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही. त्याच्या मनात ही सल कायम राहिली असणार असंच त्याचा एक चाहता म्हणून वाटतं.

हेमामालिनीसोबत हिट जोडी

धर्मेंद्र म्हटलं की ओघाने नाव येतं ते हेमामालिनीचं. दोघांचं प्रेम, ऑन स्क्रिन- ऑफ स्क्रिन केमिस्ट्री, पडद्यावर हिट झालेली जोडी सगळंच एखाद्या परीकथेसारखं आहे. धर्मेंद्रचं पहिलं लग्न झालेलं होतं. पण हेमा मालिनी त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. लोकांना ही जोडी आवडू लागली. त्यानी एकाहून एक असे सरस चित्रपटही दिले.

आयी मिलन की बेला, आया सावन झुमके, प्यार ही प्यार, जीवन मृत्यू यांसारखे रोमँटिक सिनेमा, शिकार, ब्लॅकमेल, किमत, कब, क्यूँ और कहाँ यासारखे सस्पेन्स थ्रिलर, सीता और गीता, चाचा-भतीजा, चुपके चुपके यांसारखे कॉमेडी चित्रपट धर्मेंद्रने दिले आहेत. मात्र तो रमला आणि त्याची इमेज तयार झाली ती अॅक्शन हिरोचीच. मेरा गाव मेरा देश या सिनेमाचा त्याला अॅक्शन हिरो करण्यात खूप मोठा वाटा आहे. तेवढाच वाटा आहे तो शोलेचा.

मेरा गाव मेरा देशमध्ये विनोद खन्ना व्हिलन होता आणि शोलेमध्ये आपला गब्बर. पण त्या दोघांनाही समर्थपणे पडद्यावर टक्कर दिली ती धर्मेंद्रने. बसंती इन कुत्तोंके सामने मत नाचना म्हणत धर्मेंद्र ओरडला होता तेव्हा तो सगळ्यांनाच आपला नायक वाटला. त्याने गब्बरला दिलेली टक्कर, त्याला दोन हातांमध्ये पकडून जयच्या मृत्यूचा बदला घेण्याचा केलेला प्रयत्न सगळं काही अंगावर काटा आणणारं होतं. त्यापुढेही त्याची कारकीर्द अॅक्शन हिरो म्हणूनच बहरत गेली. सिक्स पॅक अॅब्स त्याने कधीच केले नाहीत, आपली बॉडी त्याने शर्टलेस होऊन कधी दाखवलीही नाही. जेवढा तो सोज्ज्वळ आणि निरागस त्याच्या सिनेकारकिर्दीच्या सुरूवातीला वाटला तेवढाच तो तद्दन अॅक्शन पटातला अॅक्शन हिरो म्हणूनही शोभला.

अॅक्शन हिरो ही इमेज त्याने तयार केली. त्या इमेजने त्याला खूप काही दिलं. कुत्तेSSS कमीनेSSS असं म्हणत तो व्हिलनला पडद्यावर लोळवायचा तेव्हा सिनेमा बघणाऱ्याचं समाधान झालेलं असायचं. कारण आपल्या मातीतला आपला माणूस हे सगळं करतोय आपलं प्रतिनिधीत्व करतोय हे त्या पिढीला वाटायचं.

लहानपणी हीमॅन कार्टून आवर्जून बघायचो. त्यातला हीमॅन हा इंग्लिशमध्ये जोरात ओरडायचा.. I am the Master of Universe.. त्याच्योसबत त्याचा एक वाघही असायचा. धर्मेंद्रही तसाच वाटतो… देशी मातीतला हीमॅन ज्याला वाघाची गरज भासली नाही.. कारण आपली कारकीर्द तो वाघासारखीच जगला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT