Dilip Kumar: अभिनयाचा सूर्य अखेर अस्ताला!
फोटो इंडिया टुडे

Dilip Kumar: अभिनयाचा सूर्य अखेर अस्ताला!

वाचा दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीवरचा विशेष ब्लॉग

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी घेऊन आजचा दिवस उगवला आणि त्या दिवसाने हिंदी सिनेसृष्टीतला दिलीप कुमार नावाचा अभिनय सूर्य अस्ताला गेल्याची बातमी दिली. अत्यंत दुःखद घटना असंच या घटनेचं खरंतर वर्णन. कारण दिलीप कुमार नुसता अभिनेता नव्हता तर अभिनयाचं विद्यापीठ होता. अमिताभ, शाहरूख खानपर्यंत अनेकांनी दिलीपसाब यांची नक्कल केली. मात्र अस्सल माणूस अस्सल असतो बावनकशी सोन्यासारखा! दिलीप कुमारही तसेच. आपल्या संपूर्ण सिनेकारकिर्दीत दिलीप कुमार यांनी फक्त 65 चित्रपट केले. तसं बघायला गेलं तर दिलीप कुमार हे 100-200-300 सिनेमाही करू शकले असते. मात्र त्यांनी किला नावाचा शेवटचा सिनेमा केला तो 1998 मध्ये.

1944 ते 1958 थोडी थोडकी नाही चांगली 54 वर्षांची सिनेकारकीर्द होती त्यामध्ये दिलीप कुमार यांनी आपल्याला भावेल इतकंच काम केलं. त्याकाळी वर्षाला एकच सिनेमा करणार आणि 200-500 कोटी कमवणार असा व्यवहारी विचार करणारे अभिनेते नव्हते. हिंदी चित्रपटसृष्टीचं बॉलिवूड असं साधं सोपं पण हॉलिवूडवरून कॉपी केलेलं नाव झालेलं नव्हतं. चित्रपटांच्या कथांना दर्जा होता आणि त्यातले संवाद म्हणणाऱ्यांना त्या संवाद लेखनाची प्रचंड किंमत होती. आपण कोणता प्रयोग कसा केला पाहिजे? त्यासाठी कोणत्या शब्दांवर कसं वजन दिलं पाहिजे हे त्या काळातल्या अभिनेत्यांना माहित होतं. हिंदी सिनेसृष्टीत पहिल्यावहिल्या सुपरस्टारचा उदय होण्याआधी एका त्रिमुर्तीची चर्चा होती. ती त्रिमुर्ती होती राज कपूर, देवानंद आणि दिलीप कुमार. दोघेजण आधीच हे जग सोडून गेले आहेत आणि आज त्रिमुर्तीतला तिसरा देवही अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. हो तेव्हा सुपरस्टार, स्टार असा दर्जा नटांना दिला जात नसे कारण ते तुमची आमची कहाणी सांगणारे नट होते. सामान्य माणसाचं दुःख रूपेरी पडद्यावर जिवंत करणारा अभिनयाचा अनिभिषक्त सम्राट म्हणजे दिलीप कुमार. त्यामुळेच त्यांच्यामागे एक विशेषण लागलं होतं जे होतं ट्रॅजिडी किंग!

फोटो
फोटोइंडिया टुडे

1943 मध्ये दिलीप कुमार हे पेशावरहून मुंबईला आले. ते बॉम्बे टॉकिजमध्ये नोकरी करत होते. बॉम्बे टॉकिजमध्ये काम करत असतानाच वर्षभराने त्यांचा सिनेमा आला. त्या सिनेमाचं नाव होतं ज्वार भाटा! ज्वार भाटा ते किला या सिनेमांमपर्यंत दिलीप कुमार यांचा प्रवास हा अवघ्या 65 सिनेमांचा आहे. आपल्या सिनेसृष्टीतील एक गुणी कलावंत आशुतोष राणा यांनी एका मुलाखतीत दिलीप कुमार यांच्याबद्दल सांगितलेला किस्सा प्रसिद्ध आहे. आशुतोष राणा यांना दिलीप कुमार यांनी एकदा घरी बोलावलं होतं आणि सांगितलं होतं.. 'बरखुरदार चाहे आप हो या मैं हम सब खिलौने बेचनेवाले लोग हैं..और हम सब की टोकरीमें एक निश्चित संख्याके खिलौने हैं. अब ये तुम्हारे उपर निर्भर करता है की तुम अपने खिलौनोंको पाच साँलमें बेचो या तुम अपने खिलौनोंको 50 साल तक बेचते रहो.. अपने खिलौनोंको धीरे धीरे और सब्रसे बेचना आप बहुत आगे जाओगे' असं म्हणत दिली कुमार यांनी आशुतोष राणांना वडिलकीचा सल्लाही दिला होता. आशुतोष राणाने सांगितलेला किस्साही दिलीप कुमार यांच्या स्वभावाचं दर्शन घडवतो.

त्यांनी केलेल्या सिनेमांमध्ये सर्वाधिक गाजले ते म्हणजे 'अंदाज', 'आरजू', 'दिदार', 'देवदास', 'नया दौर', 'मधुमती', 'कोहिनूर', 'गंगा जमुना', 'दिल दिया दर्द लिया', 'गोपी', 'बैराग', 'शक्ती', 'विधाता', 'मशाल', 'मुगल ए आझम', 'कर्मा' अशी काही नावं घेता येतील. देवदासमधलं पारोच्या प्रेमात तीळ तीळ तुटत जाणं.. विझत जाणं.. चंद्रमुखी सोबत असूनही देवदासच्या मनात लागून राहिलेली प्रेमभंगाची टोचणी हे सगळं पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. एकूण तीन देवदास सिनेमा हिंदीत तयार झाले एक होता के. एल. सैगल यांचा, दुसरा होता दिलीप कुमार यांचा आणि तिसरा होता शाहरुख खानचा. मात्र आजही देवदास म्हटलं की समोर येतात दिलीप कुमार काऱण शरतचंद्रांनी लिहिलेलं ते पात्र दिलीप कुमार त्या सिनेमात जगले आहेत. 'होशसे कहदो कभी होश न आने पाये.. न जाने कितना दुख हुआ की मैने पिना शुरू किया... चंद्रमुखी तुम सहनशक्तीकी जीती जागती तस्वीर हों.. लोग नाटक करते हैं.. मुँहपर कालख, चुना मलते हैं.. राजा बनते हैं.. रानी बनते हैं.. प्यार करते हैं.. प्यारके न जाने कितने ढोंग रचाते हैं.. और यूँ लगता की जैसे के ये सब सच है..चंद्रमुखीभी नाटक करती हैं.. और मैं देखता हूँ.. फिर भी.. फिर भी पारो की बहुत याद आती है..' असं म्हणत दुःखाच्या सागरात बुडालेला आणि दारूच्या आहारी गेलेला देवदास दिलीप कुमारांसोबत आपणही जगू लागतो सिनेमा पाहात असेपर्यंत. देवदासचं दुःखातून ते आपल्या काळजाला हात घालतात. त्यांच्या अभिनयाची किमया आहे ती हीच.

फोटो
फोटो इंडिया टुडे

मुगल ए आझममधला दिलीप कुमारांनी रंगवलेला सलीम हादेखील तितकाच सुंदर झाला आहे. या सिनेमात त्यांची नायिका होती मधुबाला. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम जमलं होतं. तराना या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली. मधुबाला त्यांना पाहताच त्यांच्या प्रेमात पडली. गुलाबाचं एक फूल पाठवून मधुबाला यांनी आपल्या प्रेम स्वीकारा असं आर्जव दिलीप कुमारांना केलं होतं. जे त्यांनी स्वीकारलं होतं. मात्र मुगल ए आझम या सिनेमाचं शुटिंग जवळपास पाच-सहा वर्षे सुरू होतं. सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये या सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रेम फुललं होतं. अगदी निकाह करेपर्यंत वेळ आली होती. मात्र मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना हे नातं मंजूर नव्हतं. दिलीप कुमार यांनी जेव्हा मधुबालासोबत निकाह करण्यासाठी काझीला आणलं तेव्हा त्यांनी मधुबाला यांना अट घातली होती की लग्न करायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्या घरच्यांशी काही संबंध ठेवायचे नाही. मधुबाला तेव्हा काही बोलल्या नाहीत. त्यांचं ते मौन दिलीप कुमार यांना खटकलं... ते निघून गेले ते कायमचेच. पण मधुबाला नावाचा हळवा कोपरा त्यांच्या मनात कायमच राहिला.

ज्या पाच सहा वर्षात मुगल-ए आझमचं शुटिंग सुरू होतं त्यावेळी दिलीप कुमार इतरही चित्रपट करत होते. बी. आर. चोप्रा यांनी नया दौर सिनेमा करायचा ठरवलं. त्यासाठी भोपाळमध्ये जायचं होतं. सिनेमासाठी मधुबाला आणि दिलीप कुमार यांना साईन करण्यात आलं होतं. साईनिंग अमाऊंटही देऊन झाली होती. पण अताउल्लाह खान यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने मधुबाला यांना बी. आर. चोप्रा यांनी काढून टाकलं आणि साईनिंग अमाऊंट परत मागितली जी त्यांनी दिली नाही. मग काय कोर्टात खटला उभा राहिला. त्या खटल्यात दिलीप कुमार यांनी मधुबालाच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिली होती. या खटल्यात दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या आधी सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचीही चर्चा झाली. त्यावेळी दिलीप कुमार यांनी भर कोर्टात सांगितलं होतं की होय माझं मधुबालावर प्रेम आहे आणि माझ्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहिन. अर्थात ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. मधुबालाचंही निधन झालं.. मग दिलीप कुमार यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला तो म्हणजे सायरा बानू यांच्याशी लग्न करून. या दोघांचं लग्न झालं तेव्हा सायरा बानू 22 वर्षांच्या होत्या आणि दिलीप कुमार 44 वर्षांचे. पण सायरा बानू या दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावलीसारख्या राहिल्या.

फोटो
फोटो इंडिया टुडे

1998 नंतर दिलीप कुमार यांनी जणू चित्रपट संन्यास घेतला. काही अवॉर्ड शो वगळता ते कुठेही दिसले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. त्यांचा सांभाळ सायरा बानू करत होत्या. एवढंच काय त्यांना रूग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अफवाही पसरल्या होत्या. पण सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन अनेक स्थित्यंतरं पाहून जसं एखादं जहाज हळूहळू किनाऱ्याला लागतं अगदी तसंच काहीसं त्यांच्या मृत्यूचं स्वरूप होतं. साधारण सिनेसृष्टीतले बदलाच्या चार पिढ्यांचे ते साक्षीदार होते.

दिलीप कुमार यांनी काही फ्लॉप सिनेमाही दिले. मात्र काही काळ त्यांनी स्वतःला दूर ठेवलं आणि मग विधातामधून कमबॅक केलं. त्यांच्या अभिनयाची सेकंड इनिंगही तेवढीच पॉवरफुल होती. विधाता, शक्ती आणि मशाल या सिनेमांमधून त्यांनी साकारलेला चरित्र अभिनेता आजही आपल्या लक्षात आहे. शक्ती सिनेमात अमिताभ बच्चन समोर होता. या दोघांची जुगलबंदी पाहण्यास मिळाली पण सरस ठरले दिलीप कुमारच. तत्त्वांना धरून वागणारा डीसीपी अश्विनी कुमार हा त्यांनी ज्या प्रकारे साकारला तिथे आपण दिलीप कुमार यांच्याशिवाय कुणाचीही कल्पना करू शकत नाही. जी बाब शक्तीची तीच मशालची. मशाल हा यश चोप्रांचा सिनेमा होता. मशालमधला निडर पत्रकार विनोद कुमार हा त्यांनी जिवंत केला होता. त्यातला त्यांचा तो ए भाय... कोई गाडी तो रोको.. म्हणणारा सीन आजही आपल्याला अस्वस्थ करतो. पडद्यावरचं दुःख जगून आपल्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लावणारा हा अभिनेता आता हिंदी सिनेसृष्टीला अलविदा करून गेला आहे. हिंदी सिनेसृष्टीने कात टाकली.. सिनेमाही डिजिटल झाला. तरीही सिनेसृष्टीतला ध्रुवतारा म्हणून दिलीप कुमार यांचं स्थान अढळ राहिल यात काहीही शंका नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in