BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !

T20 World Cup : सलग दोन पराभवांमुळे भारताचं सेमी फायनलमधलं आव्हान धोक्यात
BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !
फोटो सौजन्य - S Sukumar

खेळ म्हटलं की हारजीत हा प्रकार आलाच. एरवी लागोपाठ सामने जिंकणाऱ्या संघाला कधीकधी एखाद्या स्पर्धेत सूर सापडत नाही आणि सगळंच बिनसतं. खेळाविषयी प्रेमभावना असलेल्या चाहत्यांनी ही गोष्ट लगेच समजेल आणि मान्यही होईल. ही गोष्ट कितीही खरी असली तरीही आपल्या संघाने किमान मैदानात लढत द्यावी अशी चाहत्यांची अपेक्षा असते. जर संघ ही झुंज न देता हार मानणार असेल तर चाहत्यांना संघावर आणि खेळाडूंवर टीका करण्याचा पूर्ण हक्क आहे.

निमीत्त आहे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं. पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडूनही भारताला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. भारतीय संघाने आणि चाहत्यांनी याआधी असे अनेक पराभव पाहिले आहेत आणि पचवले आहेत. परंतू ही स्पर्धा वेगळची आहे. एकाही सामन्यात भारतीय संघाच्या चेहऱ्यावर लढाऊ वृत्ती दिसलीच नाही. संपूर्ण संघ मॅच खेळायची आहे म्हणून खेळायची या भावनेने मैदानावर वावरताना दिसत होते.

कॅप्टन म्हणून विराट कोहलीचा हा अखेरचा टी-२० वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे विराटला विजयी निरोप द्यायचा भारतीय संघाचा मानस होता. परंतू प्रत्यक्ष सामन्यात मैदानावरचा विराटचा वावर आणि त्याचे निर्णय पाहिले की आपल्या कॅप्टन्सीचा शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटन नसेल अशी शंका घेण्यात वाव आहे.

BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !
'We were not brave enough', विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव भडकले, म्हणाले...

आक्रमक विराट वर्ल्डकपमध्ये थंड -

जसं मी वर म्हटलं त्याप्रमाणे खेळात पराभव झाला की आकाश कोसळलं अशातली काही गोष्ट नाही. पण कॅप्टन म्हणून मैदानावर वावरत असताना विराटच्या अप्रोचमध्ये ३६० अंशांचा बदल मला जाणवला. एरवी मैदानात गरज नसताना अवास्तव आक्रस्ताळेपणा करणारा विराट यंदा अत्यंत थंड आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारत १५१ पर्यंत मजल मारु शकला, विराटने या सामन्यात चांगली बॅटींगही केली. परंतू बॉलिंगदरम्यान विराट कोहलीच्या चेहऱ्यावर एकदाही आपण हा सामना जिंकू असे भाव दिसले नाहीत.

आता याला तुम्ही कोणतीही कारणं द्या, आयपीएलमुळे आलेला थकवा, बायो सिक्युअर बबलमध्ये राहणं, मानसिक स्वास्थ्य इ.इ. परंतू मैदानात उतरल्यावर खेळाडूंनी या सर्व गोष्टी मागे टाकायच्या असतात. जर संघाचा कर्णधारच खांदे पाडून आणि चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून मैदानात वावरणार असेल तर संघाकडून विजयाच्या अपेक्षा करणं चुकीच आहे.

हार्दिक पांड्या हा टीमपेक्षा मोठा आहे का?

काहीही झालं तरीही हार्दिकला संघात स्थान द्यायचंच हा विराट कोहलीचा आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटचा हट्ट हा न समजण्यासारखा आहे. यात हार्दिकच्या क्षमतेवर किंवा खेळावर प्रश्न निर्माण करण्याचा मुद्दा नाही. परंतू पाठीचं ऑपरशेन झाल्यापासून हार्दिक बॉलिंग करु शकत नाहीये ही बाब आता सर्वसाधारण क्रिकेट प्रेमींनाही दिसत आहे. पूर्वीचा हार्दिक पांड्या आणि आताचा हार्दिक पांड्या याच्या खेळात बदल झालाय. बरं, ज्या कारणासाठी तुम्ही हार्दिकला संघात घेताय ते कारणंही पूर्ण होत नाहीये. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिकने ना फलंदाजीत ना गोलंदाजीत चमक दाखवली नाहीये. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात तर हार्दिकला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं होतं. मग एवढं सगळं चित्र डोळ्यासमोर दिसत असताना हार्दिकला संघात स्थान देऊन विराट नेमका काय साध्य करु इच्छितो हेच समजत नाही.

तर्कहीन निर्णय -

कॅप्टन म्हणून विराट कोहली हा कधीही उत्तम पर्याय नव्हता असं माझं ठाम मत आहे. आयसीसी स्पर्धांमधलं त्यांच अपयश हा तर चर्चेचा मुद्दा झालाय. याच कारणासाठी त्याने टी-२० ची कॅप्टन्सीही सोडली. सामन्याचं पारडं कुठे झुकतंय हे पाहून कर्णधाराला अंदाज घ्यायचे असतात. परंतू प्लेइंग ११ असो, गोलंदाजीतले बदल असो किंवा फिल्डींग प्लेसमेंट असो प्रत्येक बाबतीत विराट कोहलीचे निर्णय हे तर्कहीन वाटत राहिले आहेत.

BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !
T20 World Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडिया अजुनही शर्यतीत, ही आहेत समीकरणं

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विराटने इशान किशनला संघात स्थान दिलं. बॅटींगमध्ये इशान किशन सलामीला येणार असंही विराटने जाहीर केलं. परंतू त्याच्या सोबत लोकेश राहुलला संधी देत विराटने पुन्हा एकदा सर्वांना बुचकळ्यात पाडलं. रोहित शर्मासारखा बिनीचा शिलेदार संघाकडे उपलब्ध असताना राहुलला इशान किशनच्या सोबत पाठवणं हे मुर्खपणाचं लक्षण होतं. टी-२० वर्ल्डकप सारखी महत्वाची स्पर्धा पहिल्यांदाच खेळत असलेल्या इशान किशनची सुरुवात अतिशय खराब झाली आणि पुढे संघाला त्याचा फटका बसला. यानंतर रोहित शर्मासह विराट कोहलीही मैदानावर टिकू शकले नाहीत आणि भारताचा डाव ११० धावांत संपला. टी-२० मध्ये आक्रमक सुरुवात होणं गरजेचं असतं, परंतू करो या मरो च्या मॅचमध्ये असा धाडसी निर्णय घेत विराटने स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे.

मिस्ट्री स्पिनरची अवास्तव हवा -

यंदाच्या स्पर्धेत भारताने वरुण चक्रवर्ती या खेळाडूला आपलं ट्रम्प कार्ड म्हणून मैदानात उतरवलं. वरुणच्या मिस्ट्री स्पिनची सर्वत्र चर्चा होती. परंतू वरुणची मिस्ट्री बॉलिंग इतकी भारी निघाली की दोन्ही सामन्यांत हा खेळाडू एकही विकेट घेऊ शकला नाही. दोन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंनी वरुणची बॉलिंग शांतपणे खेळून काढली आणि भारताचं हे तथाकथित ब्रम्हास्त्र फोल ठरवलं. रविचंद्रन आश्विनसारखा अनुभवी खेळाडू संघात असतानाही विराट आणि रवी शास्त्रींचं मॅनेजमेंट त्याचा विचार का करत नाही असा प्रश्न मनात येतो.

आयपीएलला दोष देता येईल का?

कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेतून भारत बाहेर पडला किंवा संघाची खराब कामगिरी झाली की पहिलं खापर फुटतं ते म्हणजे आयपीएलवर. आयपीएलध्ये खेळून आलेल्या थकव्याचं कारण अनेकदा भारतीय खेळाडू देत असतात. परंतू एकही भारतीय खेळाडू कधीच टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी आयपीएलमधून ब्रेक घेताना दिसत नाही. यात खेळाडूंचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात ही बाब खरी असली तरीही या गोष्टीचा बाऊ मग करण्याचा अधिकार संघाला उरत नाही.

महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय खेळाडूच आयपीएलमध्ये सहभागी होतात असं नाही. अनेक परदेशी खेळाडू ज्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता ते आपापल्या संघांकडून चांगली कामगिरी करत आहेत. याव्यतिरीक्त अनेक खेळाडू जगभरातल्या लिगमध्ये खेळत असतात. त्यांच्या बाबतीत या थकव्याचा मुद्दा ऐकायला मिळत नाही. अनेक परदेशी खेळाडू ठरवून वर्ल्डकपच्या तयारीसाठी आयपीएल खेळत नाही. परंतू अशी भूमिका भारतीय खेळाडू घेतच नाहीत.

थोडासा दोष बीसीसीआयचाही -

या संपूर्ण परिस्थितीसाठी बीसीसीआयही काही प्रमाणात जबाबदार आहे असं नक्कीच म्हणता येईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये चमकत नाहीये ही बाब बीसीसीआयमधील एकाही अधिकाऱ्याला कळली नाही? का कळूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफी, २०१९ क्रिकेट विश्वचषक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप अशा तीन संधी विराटच्या नेतृत्वात भारताकडे चालून आल्या होत्या. परंतू प्रत्येक सामन्यात विराटने आपल्या अतरंगी निर्णयांमुळे हातातली संधी गमावली.

वास्तविक पाहता २०१९ विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयने निर्णय घेत विराटला कर्णधारपदावरुन हटवायला हवं होतं. परंतू तिकडेही बीसीसीआयने बोटचेपं धोरणं घेतलं. यानंतर संघात जेव्हा विराट विरुद्ध रोहित असं चित्र तयार व्हायला लागलं त्यानंतर बीसीसीआयने पावलं उचलायला लावली.

BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !
T20 WC, Ind Vs NZ: सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचं आव्हान धोक्यात

स्पर्धेच्या आधी विराटने आपण विश्वचषकानंतर टी-२० संघाची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं. अनेक आजी-माजी खेळाडूंनी यंदा विराटसाठी भारताने कप जिंकायला हवा असं सांगितलं. परंतू पहिल्या दोन सामन्यांमधला विराटचा खेळ आणि वावर पाहता त्यालाच शेवट गोड होऊ द्यायचा नाहीये असं वाटतंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in