Aurangabad : औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 'हे' आहे कारण

Aurangabad मध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे
Aurangabad : औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 'हे' आहे कारण
Aurangabad: Police deployed near Aurangzeb's grave to prevent vandalism

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अकबरूद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी या कबरीचं घेतलेलं दर्शन. त्यावरून बराच राजकीय गदारोळ झाला. आता औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद निर्माण झाला त्यानंतर औरंगाबादमधल्या खुल्दाबाद या ठिकाणी असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळ सात ते आठ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुरातत्व विभाग आणि पोलीस विभागातर्फे हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात औरंगजेबाच्या कबरीवर वातावरण तापलं आहे. अशात या कबरीची तोडफोड होण्याची भीती आहे. त्याच अनुषंगाने हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

१२ मे रोजी एमआयमचे तेलंगणातले आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसेना नेते आणि भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाने अत्यंत हाल हाल करून मारलं. अत्यंत क्रूर छळ करून औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना ठार केलं. अशा क्रूर बादशहाच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक होतं का? असाही प्रश्न विचारला गेला.

एवढंच नाही तर यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीकाही केली. अकबरूद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई का गेली नाही असा सवालही त्यांनी विचारला.

मुघल साम्राज्यातला शेवटचा बादशहा औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये अहमदनगर या ठिकाणी झाला. त्याचा मुलगा आझम शाह आणि मुलगी झीनत ऊननिस्सा यांनी त्याचा दफनविधी खुल्दाबाद या ठिकाणी केला. हे ठिकाण औरंगाबाद शहरापासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in