Chandrapur Accident: पेट्रोल टँकर-ट्रक धडकून भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू

भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू, मृतदेह आगीत जळून खाक
Collision between the petrol tanker & truck leads to great disaster in Chandrapur
Collision between the petrol tanker & truck leads to great disaster in Chandrapur

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर

Chandrapur Accident चंद्रपूर-मूल या मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार झाले आहेत. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघाताचे भीषण व्हीडिओ समोर आले आहेत. चंद्रपूरच्या अजयपूर या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता मृतांची संख्या वाढली आहे या अपघातात आत्तापर्यंत ९ जण ठार झाले आहेत.

नेमकी काय घडली घटना?

अजयपूर या गावाजवळ पेट्रोल घेऊन जाणार टँकर आणि लाकडं नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातानंतर तेवढीच भीषण आगही लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटले आणि आगीचा भडका वाढला. या अपघातात आत्तापर्यंत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी आज सकाळपर्यंत अथक प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली. मात्र भीषण आगीमुळे मृतदेहांची राख झाली आहे. प्लास्टिकच्या पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांमध्ये अमरावतीचा निवासी हाफिज खान आणि वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतांमध्ये समावेश आले. लाकूड भरलेल्या ट्रकमध्ये बसलेल्या सात जणांचा अपघातामुळे जळून मृत्यू झाला आहे.

लाकूड भरलेल्या ट्रकमधल्या ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं

अजय डोंगरे, ३० वर्षे

प्रशांत नगराळे, ३३ वर्षे

मंगेश टिपले, ३० वर्षे

भैय्यालाल परचाके, २४ वर्षे

बाळकृष्ण तेलंग, ५७ वर्षे

साईनाथ कोडाप, ४० वर्षे

संदीप आत्राम, २२ वर्षे

रात्री झालेला हा अपघात इतका भयंकर आणि भीषण होता की रस्ताभर आगीचे लोळ आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले होते. आगीच्या लोळांमुळे जंगलातल्या झाडांनाही आग लागली. या अपघाताची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा मूल आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणची अग्निशमन पथकं रवाना झाली. अग्निशमन दल, पोलीस या ठिकाणची पथकं घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी आग नियंत्रणात आणायला सकाळ उजाडली होती.

गुरुवार १९ मे ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीक्यू २७७० आणि चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझल टँकर क्रमांक एमएच ४० बीजी ४०६० या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली. आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in