
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
राज्यात कुठेही कुणालाही हनुमान चालीसा पठण करण्यापासून रोखू नये. जर हनुमान चालीसा म्हटली जात असेल तर चांगलंच आहे. भारतात, महाराष्ट्रात किंवा नागपूरमध्ये हनुमान चालीसा म्हणण्यापासून कुणालाही रोखलं जाऊ नये. हनुमान चालीसाबाबत कुणीही राजकारण करू नये. ज्याला हनुमान चालीसा पठण करायचं आहे त्याला करू द्यावं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा तसंच रवी राणा यांच्या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांचे फोटो आहेत. त्याची चर्चा नागपूरमध्ये रंगली होती याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हटले की, ''कुणीही आमचे फोटो सकारात्मक कारणासाठी पोस्टरवर लावत असेल तर आमची काहीही हरकत नाही. विषय नकारात्मक असेल तर मात्र आमचे फोटो लावले जाऊ नयेत''
आज नागपुरात नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण केलं. नागपूरच्या पुरातन मारूती मंदिरासमोर हे पठण करण्यात आलं. त्यावेळीच राष्ट्रवादीनेही हनुमान चालीसा म्हटली. राणा विरूद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष नागपुरात पाहायला मिळाला.
काय म्हणाल्या आहेत नवनीत राणा?
''मी ३६ दिवसांनी नागपूरमध्ये आले आहे. मात्र मला असं वाटतं आहे की इतक्या दिवसांनी येऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी तसंच मारूतीरायाचं दर्शन घेण्यासाठी जाते आहे. असं असताना विरोध का दर्शवला जातो आहे? माझी इतकीच इच्छा आहे की महाराष्ट्राला लागलेला शनी (उद्धव ठाकरे) लवकरात लवकर दूर व्हावा. आम्ही दिल्लीत जाऊनही हनुमान चालीसा पठण केलं. मात्र तिथे आम्हाला काहीही त्रास झाला नाही. मात्र माझ्या महाराष्ट्रात विनाकारण त्रास दिला जातो आहे. हे सगळं उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून होतं आहे'' असाही आरोप नवनीत राणा यांनी केला.
नवनीत राणा या नागपूरच्या प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती तसंच आमदार रवी राणाही आहेत. या आंदोलनाची चांगलीच चर्चा नागपूरमध्ये होते आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षानेही हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. आता या सगळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका मांडली असून कुणालाही हनुमान चालीसा म्हणण्यापासून रोखता येणार नाही असं म्हटलं आहे.