'मृत्यूकारण' तपासून पाहूया, पाणीटंचाईवरुन मनसे आमदाराचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

सध्या तुम्ही चित्रपट प्रमोशनसाठी वाहिन्यांवर दिसत आहात, म्हणून पत्र लिहीत असल्याचा राजू पाटील यांचा टोला
'मृत्यूकारण' तपासून पाहूया, पाणीटंचाईवरुन मनसे आमदाराचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेसोबतच सध्या राज्याला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहरातील देसले पाड्यात खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. एरवी एकमेकांचे राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र लिहून चर्चा करत आयुक्त विजय सुर्यवंशी यांना हटवण्याची मागणी केली आहे.

सध्या तुम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाहिन्यांवर दिसत आहात, त्यामुळे ही घटना तुम्हाला माहिती नसेल म्हणून हे पत्र लिहीत असल्याचा टोला राजू पाटील यांनी लगावला आहे. अजून आपण किती मृत्यू व्हायची वाट पहायची आहे? असा सवाल राजू पाटील यांनी आपल्या पत्रातून विचारला आहे.

आपल्या पत्रात राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पाणी द्या म्हणून 27 गावं वर्षानुवर्ष उर बडवत आहेत. परंतू तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमलं आहेत त्यांच्या कानाशी हा आवाज पोहततच नाहीये. वारंवार वृत्तपत्रातून पाणीटंचाईच्या बातम्या येत असतात पण निर्ढावलेले आयुक्त त्या बातम्यांना केराची टोपली दाखवतात असंही राजू पाटील म्हणाले.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी, कचरा यासारख्या समस्या मांडण्यासाठी मी अनेकवेळा आपल्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी अशी विनंती केली. परंतू यात कोणतं राजकारण आडवं येतंय हेच समजत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवू आणि मृत्यूकारण तपासून पाहूया अशी विनंती राजू पाटील यांनी विचारला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता या पत्राला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.