कळव्यातल्या आंदोलनानंतर मध्य रेल्वे मार्गावरच्या १० एसी लोकल रद्द

कळव्यात एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यानंतर करण्यात आलं होतं आंदोलन
10 AC local trains on Central Railway line canceled after protest in Kalva
10 AC local trains on Central Railway line canceled after protest in Kalva

१९ ऑगस्ट पासून मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ची संख्या दहाने वाढवण्यात आली होती. मात्र प्रवाशांनी यासंदर्भात आंदोलन केलं होतं. कळवा स्थानकात एक एसी लोकल अडवून धरली होती. या सगळ्यानंतर आज म्हणजेच तब्बल सहा दिवसांनी या १० एसी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. २५ ऑगस्टपासून (गुरूवार) या सर्व ट्रेन नॉन एसी म्हणून चालवण्यात येतील.

मध्य रेल्वेने नेमकं ट्विट करून एसी लोकल्स बाबत काय म्हटलं आहे?

दिनांक १९ ऑगस्टपासून मध्य रेल्वे मार्गावर १० एसी लोकल सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या विविध निवदेनांचा विचार करून या १० एसी लोकल २५ ऑगस्ट (गुरूवार) पासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येत आहेत. या १० एसी लोकल सध्याच्या वेळापत्रकानुसार नॉन एसी म्हणून चालवण्यात येणार आहेत. एसी सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकानंतर कळवली जाईल. हे ट्विट मध्य रेल्वेने केलं आहे. आजच जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी भूमिका मांडली होती आणि मध्य रेल्वेने विचार करावा असं म्हटलं होतं.

जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलबाबत नेमकं काय म्हटलं आहे?

"१० एसी लोकलमधून ५ हजार ७०० प्रवासी प्रवास करतात आणि एका साध्या लोकलमधून २७०० प्रवासी प्रवास करतात. मग उरलेले प्रवासी कोणत्या ट्रेनने प्रवास करणार? त्याला कोणताही पर्याय शोधण्यात आलेला नाही. लोक ट्रेनच्या दरवाजांना लटकून मरत आहेत. लोकांना गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये चढता येत नाही. लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एसी लोकलच्या विरोधात आधी कळव्यात आंदोलन झालं आणि मग ते मुंबईत पसरतं आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने लोकांचा संताप वाढला आहे. कारण लोकांना एसी लोकल परवडतच नाही. ही परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक स्टेशनवर आग लागेल."

एसी लोकलच्या विरोधातलं आंदोलन पेटवायची गरजच नाही

एसी लोकलच्या या मुद्द्यावरून मी मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी बोलतो आहे. परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतल्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल. मी तर आत्ता मैदानात उतरलो आहे. सर्वसामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित आहे. आंदोलनासाठी मध्यमवर्गीय रस्त्यावर येत नाहीत. पण जेव्हा मध्यमवर्गीय लोक रस्त्यावर उतरत असतील तर अस्वस्थता किती आहे तेच लक्षात येतं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दोन महिन्यात १७० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू

जितेंद्र आव्हाड पुढे हेदेखील म्हणाले की दोन महिन्यात १७० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. लोकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? हे आंदोलन मला पेटवण्याची गरजच नाही. लोकांच्या मनातच आग लागली आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच मध्य रेल्वेला सामान्य प्रवाशांविषयी प्रेमच उरलेलं नाही अशीही टीका आव्हाड यांनी केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून येणारं उत्पन्न हे देशात सर्वाधिक आहे. त्यावर देशातल्या अनेक रेल्वे गाड्या पोसल्या जातात. आता एसी लोकल आणून तुम्ही ही सगळी परिस्थिती कठीण करत आहात असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in