'सहा महिने सत्ता भोगा'; शिवसेनेचा शिंदे गटातील आमदारांना इशारा, फडणवीसांच्या वर्मावर बोट

Shiv Sena Vs Rebel MLAs : नवं सरकार सहा महिनेच टिकेल, असं भाकित शिवसेनेनं सामनातून केलंय...
shiv sena warns this govt will be collapse in after six month
shiv sena warns this govt will be collapse in after six month

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू झालीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी तसे आदेशच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत. त्यानंतर आता शिवसेनेनंही बंडखोर आमदारांना गर्भित इशारा दिलाय. सहा महिने सत्ता भोगा, असं म्हणत शिवसेनेनं सहा महिन्यांनंतर सरकार पडेल, असं भाकित केलंय.

शिवसेनेनं पुन्हा एकदा सामनातून बंडखोरांवर तोफ डागली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. "शिंदे गटावर विश्वास व्यक्त करताना भाजप आमदारांची डोकीही अस्वस्थ झाली असतील. फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष ते आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये," असं म्हणत शिवसेनेनं फडणवीसांच्या वर्मावर बोट ठेवलं.

"सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भाजपचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही.

106 आमदारांचा मुख्यमंत्री होत नाही आणि 39 बंडखोरांचा मात्र मुख्यमंत्री होतो, यात काळंबेरं आहे, असा जो इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्याचा गर्भितार्थ शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही. कारण त्यांची झापडे बंद आहेत, पण जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असेल," असा सूचक इशारा शिवसेनेनं शिंदे गटातील आमदारांना दिलाय.

भास्कर जाधवांच्या भाषणाचा उल्लेख

"भास्कर जाधव विधानसभेत मुद्द्याचे बोलले. मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. नियती कुणाला सोडत नाही. ज्यांच्या मागे ईडी लावली त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन संरक्षण द्यावे लागले. जाधव म्हणतात, त्यावर बोला. याच ‘ईडी-पीडी’ आमदारांच्या मतांवर शिंदे गटाचे राज्य भाजपने आणले ते काय बहुमत आहे?"

शिवसेना कधीच संपणार नाही, गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

गुलाबराव पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीच्या निकालाचा हवाला देत शिवसेना संपवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीवर केला होता. शिवसेनेनं गुलाबराव पाटील यांनाही उत्तर दिलंय.

"शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल, पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे," असं म्हणत नवं सरकार सहा महिन्यात कोसळेल असा इशारा शिवसेनेनं दिलाय.

काँग्रेसच्या मंत्री-आमदारांच्या अनुपस्थितीवर आश्चर्य

"काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे," असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in