'ठळक बातम्या' अजरामर करणारे प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन
'ठळक बातम्या' अजरामर करणारे प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन
marathi news anchor of doordarshan Pradeep bhide passes away in mumbai

नमस्कार मी प्रदीप भिडे, आजच्या ठळक बातम्या.. ही वाक्यं कानावर आली की सगळेजण सरसावून त्यांच्या बातम्या ऐकत असत. ८० आणि ९० चं दूरदर्शनचं दशक हे त्यांचंच होतं. आपल्या भारदस्त आवाजाचं गारूड त्या काळी कैक पिढ्यांवर करणारे प्रदीप भिडे यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सुजाता, मुलगा, मुलगी जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.

ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेले होते. जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली आदरांजली

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनानं दूरदर्शनच्या मराठी बातम्यांना लोकप्रियता मिळवून देणारा विश्वासार्ह आवाज हरपला आहे. मराठी वृत्तनिवेदन, सूत्रसंचालक म्हणून माध्यम क्षेत्रात लीलया संचार करणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. वृत्तनिवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला प्रदीप भिडे यांच्या आवाजानं चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. त्यांच्या निधनानं माध्यम क्षेत्रातल्या तरुणांचा मार्गदर्शक हरपला आहे. माध्यमसृष्टीची मोठी हानी झाली आहे. प्रदीप भिडे यांचा आवाज लाभलेल्या जाहिरातपट, माहितीपटातून ते यापुढेही आपल्याला भेटत राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचीही आदरांजली

वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक अशा कितीतरी भूमिकांच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचलेले प्रदीप भिडेजी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. वाहिन्या आणि 24 तास बातम्यांचा काळ नव्हता, तेव्हा सायं. 7 च्या बातम्या दूरदर्शनवर ऐकायच्या त्या प्रदीप भिडेजी यांच्याकडूनच. कालांतराने अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट व्हायची आणि पुढे हा ऋणानुबंध उत्तरोत्तर वाढत गेला. प्रदीप भिडेजी यांच्या निधनाने मी एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, ही प्रार्थना !

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in