
मेट्रो थ्रीचं बहुतांश काम झालेलं आहे. मात्र सगळं गाडं अडलं आहे ते कारशेडमुळे. चांगली कारशेड झाली नाही तर मेट्रो थ्री सुरू होऊ शकणार नाही. महाविकास आघाडी सरकारने कारशेडसाठी कांजूरमार्ग हे ठिकाण सुचवलं होतं. मात्र ती जागा अजूनही वादात आहे. त्यामुळे नियोजित आरेच्या ठिकाणीच कारशेड होणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हवं तर माझ्यावर जो काही राग काढायचा आहे तो काढा पण मुंबईकरांच्या काळजात खंजीर खुपसू नका असं सांगत आरे कारशेडला विरोध केला होता. या सरकारने तो निर्णय घ्यायला नको हे सुचवलं होतं. या टीकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस कारशेडबाबत?
महाविकास आघाडी सरकारने कारशेडसाठी कांजूरमार्ग हे ठिकाण सुचवलं होतं. मात्र ती जागा अजूनही वादात आहे. ती जागा ताब्यात मिळाली तरीही तिथे कारशेड उभं राहण्यासाठी चार वर्षे लागतील. आमच्या सरकारच्या वेळी आरेची जी जागा सुप्रीम कोर्टाने क्लिअर केली होती त्या जागेवर कारशेडचं २५ टक्के काम झालं आहे. उर्वरित ७५ टक्के काम हे लगेच होऊ शकतं. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड आरेमध्येच होणार. त्यामुळे आमचा हाच निर्णय आहे की कारशेड आरेमध्येच होणार.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत काय म्हणाले फडणवीस?
उद्धव ठाकरेंचा आदर ठेवत मी हे सांगू इच्छितो की त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे मी त्यांना वारंवार सांगितलं होतं. मी त्यांना हेदेखील सांगितलं होतं की तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवून ही कारशेड आरे मध्ये होऊ द्या. कारशेड प्रकरणात केस झाली. हायकोर्टाने, ग्रीन ट्रायबुनलमध्ये सगळीकडे सहमती मिळाल्यानंतरच आम्ही आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता.
मला एका प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल का? की आसपासच्या जागा बिल्डर्सना कशा मिळाल्या? त्यांनी झाडं कुणाच्या संमतीने तोडली? आरेचा मुद्दा राजकीय करू नये. त्यामुळे मुंबईकरांचं हित पाहणं हे आमचं काम आहे आम्ही कारशेड आरेमध्येच बनवणार.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं होतं?
मला आज त्रास होतो आहे तो आरेच्या कारशेडचा. हा निर्णय घेऊ नका, मुंबईत ते जंगल साफ करू नका. माझी हात जोडून विनंती आहे की आरे कारशेडच्या रूपाने माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आत्ता तिकडे झाडं तोडून झाली आहेत. मात्र तिथे वन्य जीवन आहे.
त्या ठिकाणी रहदारी सुरू झाल्यावर वन्यजीव धोक्यात येईल. त्यामुळे आरेचा निर्णय घेऊ नका ही कळकळीची विनंती मी तुम्हाला करतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.