
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळावर त्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. द्रौपदी मुर्मू या मुंबईत काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेनेही द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा दिला आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये द्रौपदी मुर्मू याच राष्ट्रपती होतील अशीच शक्यता आहे. चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत.
शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का यावरून बरीच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या भावनेचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार का याचीही चर्चा सुरू होती. मात्र द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नाहीत हे देखील आता स्पष्ट झालं आहे.
द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यपालदेखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत. याआधी भाजप-BJD युती सरकारमध्ये २००२ ते २००४ पर्यंत त्या मंत्रीही होत्या. आता त्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.