'शिवसेनेविषयीची नाराजी हा सगळा बनाव होता'; शिवसेनेनं शिंदे-फडणवीसांना काय म्हटलंय?

Shiv sena vs Eknath shinde : पक्षाविरुद्ध बंडखोरी करत मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून निशाणा
'शिवसेनेविषयीची नाराजी हा सगळा बनाव होता'; शिवसेनेनं शिंदे-फडणवीसांना काय म्हटलंय?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपनं सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन होताच शिवसेनेनं सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय.

शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलंय की, "महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून लोकशाहीच्या विजयासाठी आकड्यांचा खेळ करता आला असता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते, पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही व आपल्या शालीन स्वभावाला साजेशी भूमिका घेतली."

"उद्धव ठाकरे यांनी जाता जाता सांगितले की, ‘मी सगळ्यांचा आभारी आहे, पण माझ्याच जवळच्या लोकांनी मला दगा दिला.’ ते खरेच आहे. ज्यांनी दगा दिला ते चोविसेक लोक कालपर्यंत उद्धव ठाकरेंचा ‘उदो उदो’ करीत होते. यापुढे काही काळ दुसऱ्यांच्या भजनात दंग होतील. पक्षातून बाहेर पडून दगाबाजी करणाऱ्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई सुरू करताच सर्वोच्च न्यायालयाने ती रोखली व पक्षांतरबंदी कारवाईशिवाय बहुमत चाचणी घ्या, असे सांगितले. राज्यपाल व न्यायालयाने सत्य खुंटीस टांगून ठेवले व निर्णय दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या भिंतीवर डोके फोडून घेण्यात अर्थ नव्हता," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"पक्षांतर करणाऱ्या, पक्षादेश मोडणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगणे घटनाबाह्य आहे, पण घटनेचे रखवालदारच अशी बेकायदा कृत्ये करू लागतात व ‘रामशास्त्री’ म्हणवून घेणारे न्यायाची तागडी झुकवू लागतात तेव्हा कोणाकडे अपेक्षेने पाहायचे?," असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

"देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी असलेले हजारो जवान खास विमानाने मुंबईच्या विमानतळावर उतरले. इतका बंदोबस्त केंद्र सरकार ठेवत आहे तो कोणासाठी? ज्या पक्षाने जन्म दिला त्या पक्षाशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी द्रोह करणाऱ्या आमदारांच्या संरक्षणासाठी? भारतासारख्या महान देशाला आणि त्या महान देशाच्या घटनेला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार? शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केले, पण पक्ष बदलण्याची व फुटीरतेला उत्तेजन देण्याची प्रक्रिया राजभवनात चालणार आहे का?," असा सवाल सेनेनं राज्यपालांना केलाय.

"महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना घटनेचे रखवालदार राजभवनावरून ताकद कशी देऊ शकतात? लोकनियुक्त विधानसभेचे हक्क आमची न्यायालये व राज्यपाल कसे काय उद्ध्वस्त करू शकतात? या प्रश्नांची उत्तरे इतकी धूसर कधीच झाली नव्हती. पण आता उत्तरे कोणालाच नकोत. सत्ता हेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर बनले आहे. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले."

"सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता," अशा शब्दात शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

"आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली? ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे," असं म्हणत शिवसेनेनं फडणवीस यांना लक्ष्य केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in