
भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर गुरूवारी रात्री हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तक्रारही घेतली नाही. यानंतर भायखळा येथील शिवसेना शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. तसंच हल्ला झालेल्या शिवसैनिकांची विचारपूस केली. शिवसैनिकांच्या जीवाशी येणार असेल तर खपवून घेणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील २०८ नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर ओढावलेली आपबिती सांगितली. हल्ल्यानंतर आमची तक्रारही पोलिसांनी घेतली नाही, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर इथल्या पोलिस ठाण्याचे इनचार्ज कोण आहेत, असं विचारत पोलिसांनी राजकारणात पडू नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पोलिसांना केलं.
'शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचं मी आव्हान करतोय. मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झाली पाहिजे. तुम्ही तातडीने कारवाई करा. आरोपींना तुम्ही चौकशीसाठी का बोलवलं नाही? असं राजकारण कधीच झालं नव्हतं. तुम्ही राजकारणात पडू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं. भायखळा येथील शिवसेना शाखेला भेट दिल्यानंतर बोलत होते.
शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. दरम्यान, भायखळा पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं.
उपमुख्यमंत्री सध्या सगळा कारभार बघत आहेत त्यांना सांगा, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या शिवसैनिकांचं रक्षण करता येतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केला नाही.