ज्यांचा वध करायचा होता, तो केला आणि घरी बसवलं; नवनीत राणा उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Navneet Rana and Ravi Rana
Navneet Rana and Ravi Rana

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "मला तुरुंगात टाकणाऱ्यांना अद्दल घडली. ही सुरूवात आहे. पिक्चर पुरी बाकी है", असं नवनीत राणा म्हणाल्या.

जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाने हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी खासदार नवनीत राणा या जळगावात आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरेंना घरी बसवलं आता महाराष्ट्राचा विकास होईल -नवनीत राणा

नवनीत राणा म्हणाल्या, "देशातील लव्ह जिहादचा खात्मा करण्यासाठी येणाऱ्या काळात काम करू. त्याची सुरूवात जळगावमधून सुरू झाली आहे. आम्ही हनुमान चालीसेचं पठण केलं म्हणून तुरुंगात टाकलं. निर्दोष होतो, तरी १४ दिवस तुरुंगात टाकलं. पण जिंकलो. आम्हाला ज्यांचा वध करायचा होता, तो केला. त्यांना घरी बसवलं आणि महाराष्ट्राचा विकास नक्की होईल."

लव्ह जिहाद : नवनीत राणांनी काय केलं आवाहन?

लव्ह जिहादच्या मुद्द्यावर नवनीत राणा म्हणाल्या, "लव्ह जिहाद प्रकरणात ज्या मुली अडकल्या आहेत, त्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्या कुटुंबाला बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. जिथे अशा घटना होतील, त्यांनी आम्हाला संपर्क करावा. आम्ही त्यांना मदत करू."

मुख्यमंत्री फेसबुकर दिसत होते; राणांचा ठाकरेंना चिमटा

"जे मुख्यमंत्री होते, ते फक्त फेसबुकवरून दिसत होते. ती सगळ्यात दुर्दैवी बाब महाराष्ट्रासाठी होती. त्याचा वध करण्यासाठी, संपवण्यासाठी मी त्या मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) हनुमान चालीसा पठण करायला सांगितलं. त्यांनी ते केलं नाही. मग आम्ही सुरूवात केली. हनुमान चालीसा पठण करण्यानं संकट संपत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे होतं. ते त्यांनी केलं नाही. मला त्यांनी तुरुंगात टाकलं, त्याची शिक्षा उद्धव ठाकरेंना भोगावी लागली. ही तर सुरुवात आहे, पिक्चर पुरी बाकी है", असं नवनीत राणा म्हणाल्या.

"मुंबई महापालिकेच्या भरोश्यावर दोन पिढ्या"

"मुंबई महापालिकेच्या भरोश्यावर दोन पिढ्या खाताहेत. यावेळी त्यांना पूर्ण विराम नक्कीच मिळणार आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त त्यांना हे करू दाखवणार आहेत", असंही नवनीत राणा म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in