Hanuman Chalisa Row : राणांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना कार्यालयावर हल्ला, अमरावतीत काय घडलं?

Navneet Rana, Ravi Rana : राणा विरुद्ध शिवसेना संघर्ष सुरूच... ४ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Hanuman Chalisa Row : राणांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना कार्यालयावर हल्ला, अमरावतीत काय घडलं?

हनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध राणा असा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळाला. हा संघर्ष सुरूच असून, आता याचे पडसाद अमरावतीत उमटले आहेत. अमरावतीत राणांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (४ मे) घडली. कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे सध्या तुरुंगात असून, त्यांना बुधवारी न्यायालयात दिलासा मिळाला. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीत त्यांच्या समर्थकांनी शिवसेना कार्यालयात जाऊन मारहाण, तोडफोड केल्याचा प्रकार घडला.

राणा विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुरूच असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना बुधवारी दुपारी मुंबईतील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राणांच्या समर्थकांनी जल्लोष केला. अमरावतीतील कार्यालयाबाहेर येऊन कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोडही केली. याची माहिती मिळाल्यानंतर राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शिवसेना कार्यालयात तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. हे कार्यकर्ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याचे प्रमुख मनीष ठाकरेंनी ही माहिती 'मुंबई Tak'शी बोलताना दिली.

'कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही पाहून घेऊ,' असा इशारा शिवसेनेचे अमरावतीचे महानगरप्रमुख भरगुडे यांनी दिलेला होता.

'कार्यालयात कुणी नसताना राणा समर्थक घुसले आणि त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. पेट्रोलच्या बॉटल्या सुद्धा त्यांनी सोबत आणल्या होत्या. आमच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अन्यथा आम्ही स्वतः कार्यालयावरील हल्लेखोरांना धडा शिकवू,' असं शिवसेनेनं म्हटलं होतं.

नवनीत राणा, रवी राणा आज येणार बाहेर

मागील १२ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. बुधवारी प्रक्रिया पुर्ण करण्यास वेळ लागल्याने राणा दाम्पत्याला आणखी एक रात्र तुरूंगातच घालवावी लागली.

आज राणा दाम्पत्य तुरूंगातून बाहेर येणार असल्याची माहिती आहे. नवनीत राणा या भायखळा तुरूंगात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा तुरूंगात आहेत. दरम्यान, नवनीत राणा यांना मानेचा त्रास होत असल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. आज दोघंही तुरूंगातून बाहेर येतील.

Related Stories

No stories found.