
पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे सीएनजी आणि गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेलबाबत अत्यंत महत्वाचं भाष्य केलं आहे. एकीकडे या किंमती वाढत असतानाच पेट्रोल डिझेल संपणार असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत नितीन गडकरी?
"पेट्रोल आणि डिझेल संपणार आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातलं इंधन आहे. राज्यात इथेनॉल निर्मिती करणारी एक अर्थव्यवस्था आपण तयार केली पाहिजे. ऑटोमोबाईल क्षेत्रात येणाऱ्या काळाला भारताला सर्वात पुढे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रातही इथेनॉल निर्मितीची अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे अशी अजित पवार यांना विनंती आहे." असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
वसंतदादा शुगर इन्सिट्युटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील दिग्गजांची उपस्थिती होती.
आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?
इलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर लवकर लाँच केले जाणार आहेत. उसाचे भाव कमी करणं कठीण काम आहे. साखरेचे भाव काहीही असूदे येणाऱ्या काळात त्याचा त्रास होणार आहे. येणाऱ्या काळात साखरेचे दर कमी होतील. येणाऱ्या काळात साखर प्रति किलो २५ रूपये ते २६ रूपये अशी होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की साखरेचे दर कमी होतात. इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी आपम बैठक घेऊ असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
पंधरा वर्षे साखर उद्योगात काम करुनही नुकसान झाले. पण हे पहिले वर्ष असे आहे की यावर्षी ना नफा ना तोटा इथपर्यंत आलोय. तुमच्याही चेहर्यावर हास्य आहे आणि माझ्याही. कारण यावेळेस साखर मोठ्याप्रमाणात निर्यात करण्यात आली आहे. उसाचे दर कमी करणं अवघड आहे. कारण त्यात खूप राजकारण आहे. साखरेचे भाव कमी होतील पण उसाचे नाही, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
फ्लेक्स इंजिनमध्ये 100 टक्के पेट्रोल ऐवजी 100 टक्के इथेनॉल टाकता येईल. यामुळे मी ऑटोमोबाईल कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्यासाठी आग्रह करतोय. पुण्यातील सर्व दुचाकी, रिक्षा इथेनॉलवर करा. इथेनॉल एक लिटर 62 रुपये तर पेट्रोल 120 रुपये आहे. पुण्यात हे सगळ्यात आधी सुरु करा. मी इथेनॉलचे पंप द्यायला सांगतो, असंही ते म्हणाले. टोयोटा, टाटा, महिंद्रा इत्यादी सगळेच ऑटोमोबाईल उत्पादक फ्लेक्स इंजिन आणणार असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.