
गडचिरोली: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व 15 हजार दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उयद शुक्ल यांनी सुनावली. रामा कांडे कुडयामी (वय 49 वर्ष) रा. ताडगाव ता. भागरागड असे आरोपीचे नाव आहे.
मृतक बंडू झुरू आत्राम याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय आरोपी रामा कुडयामी याला होता. याच संतापातून आरोपी रामा याने 25 जुलै 2019 रोजी आपल्या घराजवळील नरेश बिश्वास यांच्या दुकानासमोर पेपर वाचत बसलेल्या बंडू आत्राम याच्यावर कुऱ्हाडीने थेट मानेवर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती.
यावेळी मृतकाच्या मुलीने भामरागड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिल्याने आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीविरूध्द सबळ पुरावा सादर करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
यावेळी फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून 27 एप्रिल रोजी आरोपी रामा कुडयामी याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी कलम 302 भादंविमध्ये जन्मठेप व 15 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
या रकमेतून मृतकाच्या मुलीस 10 हजार रूपये देण्याचा आदेशही यावेळी कोर्टाने दिला आहे.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास ताडगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल, पोलीस उपनिरीक्षक राहुल नामदे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ पिंगळे यांनी केला.
दरम्यान, या निकालानंतर आत्राम यांच्या कुटुंबीयांनी कोर्टाचे आभार मानले असून निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. तसेच पोलिसांनी देखील योग्य तपास करुन सबळ पुरावे सादर केल्याने पोलिसांचेही आभार मानले आहेत.