
हिंगोली: बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये काढल्याच्या रागात जिवलग मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी औंढा पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील ढेगज येथील शुभमचा मृतदेह त्याच्या घरासमोरील बंद बाथरूममध्ये संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्यानंतर शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आलेला. उत्तरीय तपासणीमध्ये शुभमचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. मयताच्या मित्रानेच गळा आवळून खून केल्याचं यावेळी समोर आलं आहे.
आरोपीने आपल्या बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये फोटो ठेवल्याच्या कारणावरून शुभमसोबत वाद झाला होता. यावेळी आरोपीने शुभम यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. आपल्या बहिणीचा फोटो काढल्याचा राग मनात ठेवून आरोपीने त्याच्या अन्य मित्रांबरोबर मिळून शुभमचा गळा आवळून खून केला.
या प्रकरणी शुभमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून औंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मित्राच्या WhatsApp स्टेटसला बहिणीचा फोटो बघून सटकली; पोटात भोसकला चाकू
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये देखील अशीच घटना घडली होती. बहिणीचा फोटो WhatsAppच्या स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्रानेच मित्राच्या पोटात चाकू भोसकल्याची धक्कादायक घटना कल्याणनजीकच्या उल्हासनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
जखमी रोहित कांजानी याने त्याचाच मित्र विजय रूपानी याच्या बहिणीचा फोटो काही दिवसांपूर्वी स्टेट्सवर ठेवला होता. त्यावरुन त्या दोघांमध्ये जोरदार वादही झाला होता. त्याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी विजय रूपानी आणि पंकज कुकरेजा यांनी संगनमत करून रोहित कांजानी याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
थेट रोहितच्या पोटात चाकू भोसकून त्याच्या हत्येचा प्रयत्न विजय रुपानीकडून करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. मात्र, हिललाईन पोलिसांनी सुरूवातीला 326 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र वैद्यकीय रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
यातील आरोपी विजय आणि पंकज हे दोघे नेताजी चौक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या डीबी टीममधील अधिकारी बाबू जाधव आणि सुभाष घाडगे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे त्यांनी नेताजी चौकातून दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यातील चाकू आणि मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली होती.