
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीत आहे अशी माहिती त्याचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने दिली आहे. दाऊद इब्राहिम हा भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तो सूत्रधार होता. सणासुदीच्या काळात दाऊदचं कुटुंब आणि माझं कुटुंब संपर्कात असतं असंही अलीशाह पारकरने सांगितलं.
अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरने खुलासा केला आहे की दाऊद इब्राहिम कराची, पाकिस्तानमध्ये आहे. माझा जन्म होण्यापूर्वी म्हणजेच १९८६ पूर्वीच जन्माला येण्यापूर्वीच दाऊद भारत सोडून गेला होता असंही अलीशाह पारकरने सांगितलं आहे.
दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो १९८६ पर्यंत मुंबईतल्या डांबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम कराची, पाकिस्तानमध्ये असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. मला सांगायचे आहे की दाऊद इब्राहिम माझे मामा कराचीमध्ये आहे.
१९८६ मध्ये माझा जन्म झाला. त्याआधीच माझा मामा (दाऊद इब्राहिम) देश सोडून निघून गेला. मी आणि माझे कुटुंबीय त्याच्या संपर्कात नाहीत. मात्र मला हे देखील सांगायचे आहे की अधूनमधून म्हणजे ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या प्रसंगी दाऊद इब्राहिमची पत्नी आणि माझी मामी मेहजबीन दाऊद इब्राहिम, माझे मामा माझी पत्नी आयेशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात.
कोण आहे दाऊद इब्राहिम?
८० च्या दशकापासून दाऊद कायमच मुंबईतल्या अंडरवर्ल्डचा केंद्रबिंदू राहिला आहे. गँगवॉर, गुन्हेगारी जगत, हत्या, खंडणी हे सगळं दाऊदच्या मागे होतंच. दाऊद लहानपणापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा होताच. १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा दाऊद मास्टरमाईंड आहे असा आरोप त्याच्यावर आहे. मुंबईत झालेल्या स्फोटांमध्ये २५० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते तर ७०० हून जास्त लोक जखमी झाले होते.
अयोध्येतली बाबरी मशिद पाडण्यात आली. त्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. त्या काळात अनेक मुस्लिमांचा बळी गेला. ज्यानंतर दाऊदने पाकिस्तानातल्या ISI च्या मदतीने बॉम्बस्फोट घडवले. हे स्फोट RDX द्वारे घडवण्यात आले होते. १२ मार्च १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले हा आरोप दाऊदवर आहे.
दाऊद ८० च्या दशकात दाऊद देशाबाहेर पळाला. आधी तो दुबईला गेला होता. त्यानंतर आता तो कराचीत गेला आहे. दाऊदचा भाचा अलीशाह पारकरने दाऊद पाकिस्तानातल्या कराचीतच आहे असं सांगितलं आहे. ईडीला दिलेल्या जबाबात त्याने ही माहिती दिली.