
औरंगाबादमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सुखप्रीत कौर या तरूणीची शनिवारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना देवगिरी महाविद्यालय परिसरात घडली. ही घटना घडल्यानंतर या प्रकरणी तिच्यावर हल्ला करणाऱ्या शरणसिंग सेठीला अटक करण्यात आली आहे. सुखप्रीतने माझं प्रेम नाकारलं म्हणूनच तिला ठार मारलं असं शरणसिंगने सांगितलं आहे.
पोलिसांकडे शरणसिंगने काय दिली कबुली?
"सुखप्रीतला मी माझ्यावर प्रेम कर हे समजावून सांगत होतो. माझं प्रेम स्वीकारण्यासाठी तिला मी विनवण्याही केल्या. मी तिला मोकळ्या मैदानानत घेऊन गेलो आणि त्यावेळीही प्रेमाबाबत विचारणा केली. त्यावेळी एकवेळ मी मरून जाईन पण तुझ्यावर प्रेम करणार नाही असं ती मला म्हणाली. तिने मला हे बजावल्याने मी धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला आणि वार केले. लासलगावला बहिणीला भेटल्यानंतर मीदेखील आत्महत्या करणार होतो." असं शरणसिंग सेठीने सांगितलं.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास सुखप्रीत कौर या तरूणीचा खून करण्यात आला. शरण सिंगने आधी तिला फरफटत ओढत नेलं त्यानंतर तिच्यावर चाकूने वार केले. ही घटना पोलिसांना कळताच पोलीस त्या घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुखप्रीत कौरचा मृत्यू झाला होता.
शरण सिंगने सुखप्रीतला ओढत ओढन नेलं. त्यानंतर तिच्या अंगावर आणि गळ्यावर धारदार चाकूने वार केले. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास देवगिरी महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या रचनाकार कॉलनीत परिसरात ही घटना घडली. ही तरूणी उस्मानपुरा भागात वास्तव्य करत होती. आता या प्रकरणी आज पोलिसांनी शरण सिंगला त्याच्या बहिणीच्या घरून अटक केली आहे. हत्या केल्यानंतर तो लासलगावला पळाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरण सिंग आणि सुखप्रीत हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. सुखप्रीतवर शरण सिंगचं एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे तो तिच्या मागे लागला होता. ही बाब जेव्हा सुखप्रीतच्या घरी समजली तेव्हा त्यांनीही त्याला समजावून सांगितलं होतं. तरीही शरण सिंग सुखप्रीतला त्रास देत होता. शनिवारी सकाळी सुखप्रीत तिच्या मैत्रिणींसह कॉलेजला गेला होती. त्यावेळी सकाळी शरण सिंगने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र सुखप्रीत त्याच्याशी काही बोलली नाही.
शनिवारी दुपारच्या सुमारास सुखप्रीत तिच्या मैत्रिणींसोबत कॉफी प्यायला गेली होती. तिथे शरण सिंग तिचा पाठलाग करत आला. ती बाहेर येताच दोघांमध्ये वाद झाला. तो वाद विकोपाला गेला. त्यानंतर शरण सिंगने सुखप्रतीला धरलं आणि फरफटत नेत रिकाम्या प्लॉटच्या दिशेने ओढू लागला. त्यावेळी तिच्यासोबतच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत शरण सिंग मनप्रीतला ओढत घेऊन रिकाम्या जागेवर गेला होता. त्याने तिच्या पोटावर, मानेवर, छातीवर चाकूने वार केले आणि दुचाकीवरून पळून गेला. आज पोलिसांनी त्याला लासलगावहून अटक केली आहे.