
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्या ठिकाणी खून झाला होता त्या ठिकाणी साक्षीदाराची टोपी पडली होती. टोपी हाच मुख्य धागा पकडुन विष्णू नगर पोलिसांनी १२ तासात गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे.
आरोपी अर्जुन आनंदा मोरे (वय-३९) हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या डोंबिवली येथील बावनचाळ या परिसरात राहतो. ज्याची हत्या झाली तो प्लास्टिक गोळा करून आपल्या उदरनिर्वाह करत होता.
हे प्रकरण नेमकं काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमरास डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
साधारण ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तत्काळ पोलिसांची तीन पथके तयार केली. मैदानाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही बघून त्यात मृत व्यक्ती पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसत आहे.
मृतदेहा शेजारी सापडलेल्या टोपीवरून आरोपीचा माग ..
कुठलीही कागदपत्रे किंवा मोबाईल फोन नसल्याने मृतकाचे ओळख पटली नसून तपासामध्येही अडचणी निर्माण होत होत्या. मात्र
ज्या बावनचाळीत खून झाला होता त्याच ठिकाणी साक्षीदारांची टोपी पडलेली पोलिसांना सापडली. नेमका हाच धागा पकडून सीसीटिव्हीद्वारे या टोपीला मिळती जुळती टोपी कोणी घातली आहे. याचा अंदाज घेत साक्षीदाराला पोलिसांनी शोध सुरु केला.
टोपी असलेला साक्षीदार बॅग पॅक करण्याच्या पूर्ण तयारीत होता, त्याचवेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला, त्याने अर्जुन नावाच्या व्यक्तीने हा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर अर्जुन नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू झाला. आरोपी अर्जुन हा डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात झोपला होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला. आरोपी हे घटनेच्या दिवशी दारू प्यायले होते. त्या दिवशी रेल्वे मैदानात जेवण देण्यावरून दोघात वाद होऊन मृतकने शिवीगाळ केली. याच वादातून त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्या मारून हत्या केल्याची आरोपीने पोलिसांना कबुली दिल्याने त्याला अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे आणि मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वडणे आणि विष्णूनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी या गुन्ह्याची उकल केली असून त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख अद्यापही गुलदस्त्यात आहे.