
- योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
नागपूरच्या हिंदुस्थान कॉलनी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंजिनीअर मुलाने आपल्या आईची हत्या करुन नंतर विषप्राशन करत आपलं आयुष्य संपवलं आहे. श्रीनीवास चोपडे (वय 51) असं या मुलाचं नाव असून मृत आईचं नाव लीला चोपडे (वय 75) असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनीवास यांनी सर्वात आधी लीला यांच्यावर चाकूने वार करत त्यांचा खून केला आणि नंतर आत्महत्या केली. हिंदुस्थान कॉलनी परिसरात चोपडे यांचं एक मोठं घर आहे. श्रीनीवास यांनी लग्न न केल्यामुळे ते आईसोबत एकटेच रहायचे. श्रीनीवास हे नोकरीही करत नसल्याचं समोर येतंय.
गेल्या तीन-चार दिवसांपासून चोपडेंचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घरी धाव घेतली. परंतू घर बंद असल्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला. ज्यानंतर त्यांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची माहिती दिली. धंतोली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना सत्य कळून आलं.
लीला चोपडे यांचा मृतदेब बेडरुममध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला. प्राथमिक चौकशीवरुन हा मृतदेह तीन ते चार दिवस जूना असल्याचं कळतंय. श्रीनीवास यांनी हे पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.