
Gangrape in Marcedes : हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन मुलांवर हा गंभीर आरोप केला गेला ते ११ वी आणि १२ वीतले विद्यार्थी आहेत. हे तिघेही अल्पवयीन आहेत असं कळतं आहे. मर्सिडिझ कारमध्ये या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात जो प्राथमिक तपास केला त्यात ज्या तिघांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे त्यातला एक जण तेथील स्थानिक आमदाराचा मुलगा आहे. तसंच हे तिघेही श्रीमंत घरातले आहेत असंही कळतं आहे. सामूहिक बलात्काराची ही घटना २८ मे रोजी झाली. पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी १ जून रोजी पोलिसात तक्रार नोंदवली. जुबली हिल्स पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांकडे जी तक्रार देण्यात आली आहे त्यानुसार १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी २८ मे रोजी एका हायप्रोफाईल पार्टीमध्ये गेली होती. ही पार्टी हैदराबादच्या एका पबमध्ये आयोजित करण्यात आली होती.
Hyderabad Gangrape News - रात्री उशिरा जेव्हा पीडित मुलगी पबमधून घरी जाण्यास निघाली तेव्हा या तिघांनी त्यांच्या मर्सिडिझमधून घरी सोडून देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी कारमध्ये चारजण बसले होते.
या धक्कादायक घटनेनंतर या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. तिच्या शरीरावर गंभीर जखमाही झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीने आत्तापर्यंत एकाच आरोपीची ओळख पटवली आहे. पीडित मुलीने ज्या मुलाचं नाव सांगितलं आहे तो तेथील स्थानिक आमदाराचा मुलगा आहे. त्याशिवाय त्याचा एक साथीदारही तिथे होते. या मुलाचा दुसरा जो मित्र आहे तो अल्पसंख्याक बोर्डाच्या अध्यक्षांचा मुलगा आहे असंही बोललं जातं आहे.
पोलिसांना पीडित मुलीने सांगितलं की जो अत्याचार तिच्यावर झाला त्याआधी आरोपींनी कार एका पेस्ट्री शॉपजवळ थांबवली होती. त्यानंतर कार जेव्हा एका निर्जन ठिकाणी पोहचली तेव्हा या मुलांनी आपल्याला मारहाण केली असंही या पीडितेने सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या जबाबानंतरच या प्रकरणात बलात्काराची कलमं समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस आता पार्टीत आलेल्या इतरांना ओळख पटवण्यासाठी बोलवत आहेत. तसंच पार्टीत गेलेल्या इतरांची चौकशीही करण्यात येते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केलं गेलं नव्हतं किंवा दारूही कुणी प्यायलं नव्हतं. आता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे काही माहिती मिळते का याचा तपास करत आहेत.