
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येपूर्वी त्याच्या घराची, कारची आणि तो ज्या रस्त्याने प्रवास करतो त्याची 8 वेळा रेकी करण्यात आली होती. ज्या दिवशी मूसेवालाची हत्या करण्यात आली त्याच्या 15 दिवस आधीपासून 6 शूटर मूसेवालाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. 8 वेळा मूसेवालाला मारण्याचा प्रयत्न शुटर्सने केला परंतु तो मारला जाऊ शकला नाही. कारण सिद्धू नेहमी बुलेट प्रूफ कार आणि सशस्त्र कमांडोंसोबत असत.
अटक करण्यात आलेले शुटर्स प्रियव्रत फौजी आणि जगदीप रूपा हे ऑपरेशनशी संबंधित प्रत्येक अपडेट थेट गोल्डी ब्रारला फोनवर देत होते. हत्येच्या दिवशी संदीप केकरा आणि निक्कू यांनी गोल्डी आणि सचिनला व्हिडिओ कॉल केला. त्यांनी सांगितले की, मूसवाला बुलेटप्रूफ वाहनाशिवाय बाहेर पडला आहे. यानंतर गोल्डीने लगेच प्रियव्रत आणि रूपालाला मुसेवालाचा खात्मा करण्यास सांगितले.
'एके-47 ने मेला नाही तर हँडग्रेनेडने उडवून द्या'
जेव्हा सगळे शुटर्स रेकी करण्यासाठी मूसेवालाच्या गावी पोहोचले तेव्हा त्यांच्या गाडीत हॅण्डग्रेनेडसह हायटेक गन होत्या. रेकी करताना शुटर्स मानसा गावाच्या आसपास आपला मुक्काम करत. गोल्डी ब्रारने शुटर्सना स्पष्ट आदेश दिला होता की, जर एके-47 किंवा इतर कोणत्याही शस्त्रासह ऑपरेशन यशस्वी झाले नाही, तर मुसेवालाचे वाहन हँडग्रेनेडने उडवून द्या, परंतु यावेळी कोणत्याही परिस्थितीत मूसेवाला वाचला नाही पाहिजे.
हत्याकांडात वापरलेली बहुतांश शस्त्रे ही परदेशातून आली होती. गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स यांच्या सांगण्यावरून या शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली होती. हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटर्सना फक्त राहण्या-खाण्याचे तसेच गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याचे पैसे मिळाले होते. उर्वरित रक्कम त्यांना काम पुर्ण झाल्यानंतर मिळणार होती.
3 शूटर्सना अटक
सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील तीन शूटर्सना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी गुजरातमधील मुंद्रा येथून अटक केली आहे. आरोपींना दिल्ली न्यायालयात हजर केले असता तिघांनाही 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ हातबॉम्ब, डिटोनेटर आणि 36 राउंड पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. एके सीरिजची असॉल्ट रायफलही त्याच्याकडे सापडली आहे.
महाराष्ट्रातील दोघांवर संशय
पंजाबमध्ये झालेल्या हत्येचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुण्यातील संतोष जाधवचे नाव सिद्धू मुसेवाला हत्याकांडात समोर आले आहे. पोलीस संतोषची कसून चौकशी करत आहेत. पुणे ग्रामिण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पंजाबचे 2 आणि हरियाणाचा 1 शुटर
अटक करण्यात आलेल्या शूटर्सपैकी प्रियव्रत फौजी असे एकाचे नाव आहे. तो हरियाणाचा गुंड आहे. कशिश कुलदीप असे दुसऱ्या शूटरचे नाव आहे. कुलदीप (24) हा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सज्यान पाना गावातील प्रभाग क्रमांक ११ चा रहिवासी आहे. केशव कुमार असे स्पेशल सेलच्या ताब्यात असलेल्या तिसऱ्या शूटरचे नाव आहे. 29 वर्षीय केशव हा पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील आवा बस्ती येथील रहिवासी आहे.
सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी हत्या झाली
सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी हत्या झाली. त्यांचे वय अवघे 28 वर्षे होते. सिद्धू मुसेवाला याच्या निधनाने त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगरवरील हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी घेतली. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची योजना फार पूर्वीपासून तयार करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता.