Crime: आई-वडिलांची हत्या ते 7 जणांचा एकाच मुलीवर बलात्कार, 15 दिवसातील 6 खळबळजनक घटना

कल्याण-डोंबिवली सारखी सुशिक्षित शहरं ही आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालली आहे. गेल्या पंधरा दिवसात इथे अत्यंत भयंकर अशा घटना घडल्या आहेत. त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा.
kalyan dombivli crime last 15 days 6 big case crime increased
kalyan dombivli crime last 15 days 6 big case crime increased(प्रातिनिधिक फोटो)

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: सांस्कृतिक नगरी डोंबिवली, ऐतिहासिक शहर कल्याण आणि श्रीक्षेत्र असलेल्या टिटवाळा शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊन नंतर आर्थिक संकटात सापडलेला तरुणवर्ग गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र मागील काही दिवसात घडलेल्या घटनांवरून दिसून आले आहे. १ जून ते १५ जून या पंधरा दिवसांच्या कालावधीत कल्याण परिमंडळ ३ च्या हद्दीतील गुन्हेगारी आकडा पाहता ही आपल्याला चटकन लक्षात येईल.

मुलाने जन्मदात्या आईवडिलांची, मित्राने मित्राची तर चोरीच्या कामात अडथळा आणणाऱ्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याच्या घटना घडल्या असून त्याचबरोबर, घरफोडी, चेन स्नॅचिंग, मोबाइल चोरी, हल्ला, मारामारी यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टिटवाळा, कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम या भागातील गुन्ह्यांची संख्या देखील मोठी आहे.

● कल्याण परिमंडळ-3 आणि कल्याण तालुक्यात 15 दिवसांत 6 मोठ्या घटना घडल्या.

1. पहिली घटना 1 जून रोजी कल्याण पश्चिम येथे घडली. या घटनेत हसन खोत या गॅरेज कर्मचाऱ्यावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता. हसन गाडी धुण्यासाठी आला असता सागर माळवे नावाचा एक व्यक्ती आला, त्याने हसनकडे एक हजार रुपये मागितले. हसनने बॉस पैसे देतील असे सांगितले, पण संतापलेल्या सागर व त्याच्या दोन साथीदारांनी हसनवर चाकूने वार केले.

या हल्ल्यात हसन गंभीर जखमी झाला. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने सागर माळवे याला अटक केली होती.

2. दुसरी घटना 3 जून रोजी कल्याणमध्येच घडली. यात मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला. कल्याण पश्चिमेतील एका पडक्या इमारतीत एका तरुणाचा खून झाल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. आरोपी शेर बहादूर धामीला २४ तासांत अटक करण्यात आली.

थापा असे मृताचे नाव आहे. थापा आणि धामी हा मूळचा नेपाळचा आहे. धामी आणि थापा हे मित्र होते. त्याच्याकडे राहण्यासाठी घर नसल्याने ते पडीक इमारतीत राहत होते. थापा नेहमी रात्री मौजमस्तीसाठी मुली आणायचा. मित्र धामीसमोर त्यांच्याशी मौजमजा करायचा. अनेकवेळा धामीने थापाला विरोधही केला. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणही झालं होतं. मात्र, थापा ऐकत नसल्याने दोघांमधील वाद वाढत गेला. त्यामुळे संतापलेल्या धामीने थापा याच्यावर दगडाने हल्ला करून त्याची हत्या केली. पोलिसांनी धामीला अटक केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

3. तिसरी घटना ८ जून रोजी टिटवाळा कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. एका निर्दयी मुलाने आई-वडिलांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक भोसले (55), त्यांची पत्नी विजया भोसले (50) आणि त्यांचा मुलगा अनमोल भोसले (37) हे कल्याणजवळील टिटवाळा मांडा येथील पंचवटी चौकात असलेल्या साई दर्पण इमारतीत राहत होते.

अनमोल एका खाजगी कंपनीत कामाला होता, अनमोलने आपल्या बहिणीला 8 जून रोजी सायंकाळी आई-वडिलांची हत्या केल्याचे सांगितले आणि तिला घरी बोलावले. गुरुवारी, ९ जून रोजी सायंकाळी बहीण घरी आली असता घरातून दुर्गंधी येत होती. अनमोलच्या बहिणीला आई-वडिलांचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून तिला धक्काच बसला.

अनमोल मृतदेहाच्या बाजूला बसला होता. सर्व काही संशयास्पद असल्याचे पाहून बहिणीने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलगा अनमोल याला अटक केली.

तपासादरम्यान अनमोलने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने गळ्यावर वार करून आई-वडिलांचा गळा चिरल्याचे सांगितले. अधिक तपासात अनमोल हा काहीसा मनोरुग्ण होता त्यामुळेच त्याने हा खून केल्याचे समोर आले. मात्र त्यामागचे नेमके कारण काय? ते अजूनही समजले नाही.

kalyan dombivli crime last 15 days 6 big case crime increased
Crime: मावशीसोबत अनैतिक संबंध, गरोदर पत्नीच्या हत्येचं भयंकर प्रकरण

4. चौथी घटना डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात १३ जूनची आहे. या घटनेत एका व्यक्तीची ओळख नसताना एकत्र बसून दारू पिऊन रात्री एकाची हत्या करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

45 ते 50 वयोगटातील या व्यक्तीचा डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एसीपी सुनील कुराडे यांनी तातडीने तीन पोलिस पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले ज्यामध्ये मृत व्यक्ती पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसत आहे. मृत व्यक्तीकडे कोणतीही कागदपत्रे व मोबाईल फोन नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.

ज्या ठिकाणी खून झाला त्याच ठिकाणी पोलिसांना साक्षीदाराची टोपी पडलेली आढळली. हा धागा पकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला. टोपी असलेला साक्षीदार बॅग पॅक घेऊन पळून जाण्याच्या तयारती होता. तोच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीत अर्जुन मोरे नावाच्या व्यक्तीने हा खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर अर्जुन नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू झाला. आरोपी अर्जुन मोरे हा डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात होता. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

5. पाचव्या घटनेमध्ये डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ जून रोजी एका चौकीदाराची तीन चोरट्यांनी लोखंडी वस्तूने हत्या केल्याची घटना घडली आहे. ज्ञान बहादूर भीम बहादूर गुरुम (६४) असे मृताचे नाव आहे. तो खंबाळपाडा रोड येथील विजय पेपर प्रॉडक्ट्स कंपनीत चौकीदार होता.

ग्यान बहादूर हा मंगळवारी रात्री विजय पेपर कंपनीत कार्यरत असताना तीन चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने कंपनीत प्रवेश केला आणि प्रतिकार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चोरट्यांनी त्यांच्या संपूर्ण अंगावर धारदार लोखंडी वस्तूने वार करून हत्या केली आणि लाखो किमतीचे धातू चोरले. यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास करत तीन आरोपींना अटक केली.

6. सहावी घटना १५ जून रोजी कल्याण पूर्वेत घडली आहे. गेल्या दीड वर्षांपासून 7 तरुण एका तरुणीच्या मदतीने पीडित मुलीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. मानसिक व शारीरिक आघाताला कंटाळून अखेर मुलीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांना तरुणीच्या मोबाइलमध्ये सुसाईड नोट सापडली असून कोळसेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. या गुन्ह्यात आरोपी तरुणी सात तरुणांना मदत करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हे सात विकृत तरुण तरुणीच्या मदतीने हा गुन्हा करत होते. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी कल्याणमधील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची मुले आहेत. कुटुंबीयांवर दबाव टाकत आहेत, तसेच आमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही कुटुंबीय करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in