
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही तिच्या विविध वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता लॉक अप या शोमध्ये तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणाविषयी कंगनाने केला आहे.
काय म्हणाली आहे कंगना?
MX Player आणि ALT Balaji या दोन अॅपवर कंगनाचा लॉक अप हा शो चर्चेत आहे. या शोमध्येच कंगनाने लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणावर धक्दायक खुलासा केला आहे. कंगनाने सांगितलं की, ''मी लहान होते, त्यावेळी मला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. दरवर्षी अनेक मुलांना यातून जावं लागतं. बालपणी मी पण अशाच प्रसंगाची शिकार झाली होती. माझ्यापेक्षा थोडा मोठा असलेला मुलगा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता.
त्यावेळी माझ्यासोबत काय घडतं आहे ते मला ठाऊक नव्हतं. लहान वयात असं करणाऱ्या मुलांनाही शिक्षा दिली जात नाही. ज्याने माझ्यासोबत हे केलं तो देखील माझ्यापेक्षा थोडाच मोठा होता. मात्र अशा घटना ज्यांच्यासोबत घडतात त्या मुलांच्या मनात आयुष्यभरासाठी एक भीती बसते.''
Lock Upp मधला स्पर्धक आणि कॉमेडियन मुन्नवर फारुकीने त्याच्या लहानपणीच्या प्रसंगाबाबत सांगितलं. तो म्हणाला आजवर मी कुणाशीच ही गोष्ट बोललो नाही. मी फक्त सहा वर्षांचा होतो तेव्हा काही चुकीच्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. ४-५ वर्षे मला काहीही समजलं नाही. मात्र एका क्षणी या सगळ्याचा अतिरेक झाला असं सांगत असतानाच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला रडताना पाहून कंगनालाही वाईट वाटलं त्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला.
या शोमध्ये प्रत्येकाला एक सिक्रेट सांगायचं होतं. मुन्नवर फारुखीने जेव्हा त्याचं सिक्रेट सांगितलं तेव्हा त्याने त्याच्यासोबत लैंगिक शोषण कसं झालं हे सांगितलं. हे सांगत असताना तो भावूक झाला होता. अशात कंगनानेही तिच्यासोबत काय घडलं ते सांगितलं. एवढंच नाही तर कंगना म्हणाली की ज्या मुलांसोबत असे प्रसंग घडतात त्या मुलांना वाटतं की हे सगळं घडल्याने जणू काही आपणच अपराधी आहोत. अशा मुलांच्या मनावर अशा प्रसंगांचा गंभीर परिणामही होतो. लैंगिक शोषण झालेली अनेक मुलं मानसिकदृष्ट्या खचून जातात असंही कंगनाने म्हटलं आहे.