Kerala restaurant : मायलेकीने ऑनलाईन मागवला पराठा, रॅपरमध्ये निघाली सापाची कात
Kerala Restaurant Snake Skin News : आपण स्विगी किंवा झोमॅटोवरून अनेकदा ऑनलाईन जेवण मागवतो. अगदी असंच केरळमध्येही झालं... एका माय-लेकीने भूक लागली म्हणून पराठा ऑर्डर केला. मात्र पराठ्याचं पार्सल घरी आल्यावर त्यांना धक्काच बसला. या पराठ्यासोबत चक्क सापाची कातही होती.
केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये ही घटना घडली आहे. तिरूवनंतपुरममध्ये प्रिया आणि तिची मुलगी राहतात. त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी ऑनलाईन दोन पराठे ऑर्डर केले. काही वेळाने त्यांचे पराठे आले. दोन्ही पराठे वेगवेगळे पॅक केलेले होते.

मुलीने पहिला पराठा खाल्ला तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर तिची आई प्रिया पराठा खाणार होती. तिने पाकीट उघडलं आणि पराठ्याचा तुकडा मोडला. मात्र त्यावर सापाची कात होती. जे पाहून ती घाबरून गेली. ही कात अंगठ्यापेक्षाही मोठी होती.
Snake Skin In Packaging Parotta Viral News : मीडिया रिपोर्टनुसार हे प्रकरण तिरूवनंतपुरम च्या नेदुमंगड भागातली आहे. ५ मे रोजी प्रियाने तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी दोन पराठे ऑनलाईन मागवले. त्यातल्या एका पराठ्यात सापाची कात निघाली. त्यानंतर हे प्रकरण घेऊन प्रियाने पोलीस ठाण्यात दाद मागितली.

पोलिसांनी या प्रकरणी सेफ्टी ऑफिसरकडे तुम्ही तक्रार करा असं सांगितलं. प्रियाने त्यानंतर फूड सेफ्टी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ज्यानंतर रेस्तराँचं चेकिंग झालं. त्या चेकिंगमध्ये या रेस्तराँमध्ये अनेक त्रुटी असल्याचं आढळून आलं.
मीडिया रिपोर्टनुसार नेदुमंगडच्या फूड सेफ्टी ऑफिसर अर्शिता बशीर यांनी म्हटलं आहे की सापाची कात त्या कागदात मिळाली ज्यामध्ये पराठा पॅक केला होता. जेव्हा हा पराठा पॅक करण्यात आला तेव्हा अंधार होता. त्यात ही गडबड झाली. रेस्तराँने निष्काळजीपणा केल्याचं फूड सेफ्टी ऑफिसरने म्हटलं आहे. तसंच स्वच्छतेच्या बाबतीतही रेस्तराँमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. त्यानंतर या रेस्तराँचं लायसन रद्द झालं एवढंच नाही तर रेस्तराँच्या मालकाला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.