
धनंजय साबळे, अमरावती: अमरावतीच्या डॉक्टर प्रियंका दिवाण या विवाहित महिलेचा अतिशय थंड डोक्याने खून केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. सुरुवातीला प्रियंकाने आत्महत्या केली असं भासवण्यात आलं होतं. मात्र, आता तिची कट रचून हत्या केल्याचं उघड झालं आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी अमरावतील शहरातील राधा नगरमधील श्री साई हेल्थ केअर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वर राहणाऱ्या दिवाण परिवारातील डॉक्टर प्रियंका मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. प्रथम दर्शनी त्यांनी जहरी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामुळे अमरावती पोलिसांनी देखील सुरुवातील आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता.
सुरुवातीला प्रियंकाचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याने डॉक्टरांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला तेव्हा प्रियंकाने आत्महत्या नव्हे तर तिची हत्या झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला.
प्रियंकाचा डॉक्टर पती पंकज दिवाण व त्याची आई आणि बहिणीने शांत डोक्याने कट रचून तिची हत्या केल्याची बाब अखेर तपासात पुढे आली. प्रियंकाचा मानसिक व शारीरिक छळ करून तिची हत्या करण्यात आली होती. पण प्रियंकानेच आत्महत्या केल्याचं भासवत आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मृत प्रियंकाच्या बहिणीने गाडगे नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. यासोबतच शवविच्छेदन अहवालात प्रियंकाला डोक्याला आतून मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याचे अहवालात म्हटले होते.
प्रियंकाच्या लहान बहिणीच्या तक्रारीवरून डॉक्टर पंकज दिवाण आणि त्याची आई शोभा दिवाण व बहिण स्मिता कांबळे यांच्याविरुद्ध कलम 302, 201, 498, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंकाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, प्रियंकाचे 24 ऑगस्ट 2019 रोजी डॉक्टर पंकज दिवाणसोबत लग्न झाले होतं. लग्नानंतर तीन महिने सासरकडील लोकांनी तिला चांगली वागणूक दिली. पण त्यानंतर डॉक्टर दिवाण हे नेहमी प्रियंकावर चिडचिड करत होते.
लहान-लहान गोष्टींवरुन देखील डॉक्टर दिवाण हे प्रचंड चिडचिड करायचे. कधी-कधी त्यांच्यातील वाद हा इतका विकोपाला जायचा की, ते तिला मारहाण सुद्धा करत होते. नेहमी प्रियंकाला डिवचण्यासाठी ते असंही म्हणायचे की, पहिल्या पत्नीला घरी घेऊन येतो. तू निघून जा. असं म्हणत ते प्रियंकाचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करत होते. असं तक्रारीत नमूद केलं आहे.