
मुंबई: अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आईने आपल्या 19 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेला पारशीवाडा परिसरामध्ये राहणाऱ्या आईने स्वतःचं मनोरुग्ण मुलीला गळफास लावून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
19 वर्षाची मुलगी मनोरुग्ण असल्यामुळे त्या मुलीचा देखरेख करणं महिलेला जिकरीचं जात होतं. म्हणून आईनेच मुलीच्या हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे महिलेने सुरुवातीला आपल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेने आपणच मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.
नेमकी घटना काय?
काल (15 जून) संध्याकाळी आईने आपल्या 19 वर्षाच्या मुलीची हत्या करून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये कॉल करून पोलिसांना माहिती दिली की, माझ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
मात्र अंधेरी पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व गोष्टींची पाहणी केल्यानंतर मुलीच्या आईकडे याबाबत चौकशी केली. यावेळी मुलीच्या आईच्या जबाबात विसंगती असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे पोलिसांचा मुलीच्या आईवरील संशय अधिक बळावला. ज्यामुळे त्यांनी मुलीच्या आईची कसून चौकशी केली. अखेर आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली आईने दिली. त्यामुळे या प्रकरणात अंधेरी पोलिसांनी मुलीच्या आईविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी जेव्हा अवघ्या आठ महिन्यांची होती. तेव्हा ती उंचावरुन जोरदार खाली पडली होती. त्यामुळे तिच्या मेंदूला दुखापत झाली होती. तेव्हापासून मुलगी मनोरुग्ण झाली होती. तब्बल 19 वर्षांपर्यंत आईने मनोरुग्ण मुलीचा देखभाल केली. पण यामुळे घरात सातत्याने नैराश्याच्या वातावरण निर्माण झालं आणि म्हणूनच आईने मुलीची हत्या केल्याची माहिती पोलिसांसमोर दिली आहे.
सध्या अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी महिलेला अटक केली आहे. यासंदर्भात अधिक तपास अंधेरी पोलीस करत आहेत.