उस्मानाबाद : बालकांची तस्करी करणाऱ्या अंतरराज्यातील टोळीचा पर्दाफाश; मुलांची आई असल्याचं सांगून...

या टोळीतील 3 जणांना अटक करीत त्यांच्याकडून 5 बनावट आधार कार्ड, 5 मोबाईल जप्त केले आहेत.
Osmanabad police
Osmanabad police

गणेश जाधव, उस्मानाबाद

बालसुधारगृहातील बालकांना बनावट आधारकार्डच्या आधारे पळवून नेणाऱ्या आंतरराज्य तस्कर टोळीचा उस्मानाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 3 जणांना अटक करीत त्यांच्याकडून 5 बनावट आधार कार्ड, 5 मोबाईल जप्त केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली अल्पवयीन मुले बालसुधार गृहात ठेवली जात होती. त्यांचे पालक असल्याचा दावा ही टोळी बोगस आधारकार्ड बनवून करीत असे व त्यानंतर त्या बालकांना घेऊन पळून जात असे.

असा झाला पर्दाफाश

उस्मानाबाद शहरातील बाल सुधारगृहातील मुलाला बनावट आधार कार्ड ओळखपत्र व जन्मदाखला घेऊन आई म्हणून एक महिला मुलास घेण्यासाठी यायची. वारंवार एकच महिला बनावट आधारकार्ड घेऊन मुलांना घेऊन जायला येत असे. त्यामुळे संशय वाढल्यावर बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा मारून एस लक्ष्मी कृष्णा या महिलेस ताब्यात घेतले.

एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश

तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता ती समाधानकारक उत्तर देत नव्हती. तिच्याकडे 42 हजारांची रोख रक्कम, 3 बनावट आधारकार्ड आणि चोरीचा एक मोबाईल आढळून आला. तिच्याकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी शहरातील पोद्दार इंग्लिश स्कुलजवळून दोघांना ताब्यात घेतले. एकाने आपलं नाव गंगाधर सुभाराव (48) तर दुसऱ्याने एस. साई व्यंकटेश (27) असं नाव सांगितलं. त्यांच्याकडून 2 बनावट आधारकार्ड, पाच चोरीचे मोबाईल, बनावट वाहन परवानासह बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली.

तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

या टोळीवर 420,468,471,370,511 व 34 भादवी अंतर्गत आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे करीत आहेत. या टोळीतील 3 आरोपीना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टोळीतील गुन्हेगार व बालके ही आंध्रप्रदेश राज्यातील करनूल येथील आहेत. पोलिस यांचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांची पथके आंध्रप्रदेशमध्ये रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

आरोपी आणि मुलांची डीएनए टेस्ट केली जाणार : पोलीस

या टोळीतील आरोपी व त्यांनी घेऊन गेलेली मुले यांचे डीएनए टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा, लोहारा या भागात काही लहान मुले चोरी करताना पकडले होते. ती अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्यातील 1 मुलगी व 2 मुलांना या टोळीने पालक असल्याचा दावा करुन पळवून नेले आहे. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरक्षक चैनसिंग गुसिंगे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in