
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गर्भवती महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि त्याच्या एका दूरच्या मावशीला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत भयंकर असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. महिलेचा पती आणि त्याच्या मावशीचे असलेले अनैतिक संबंध आणि हुंड्याची मागणी हे गरोदर महिलेच्या हत्येचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
महिलेच्या हत्येनंतर तिचा पती आणि त्याच्या मावशी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या हत्येचा संशय त्यांच्याच घराच्या वरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका ठेकेदार आणि त्याच्या मजुरावर व्यक्त केला होता. तसेच लुटीच्या उद्देशाने महिलेची हत्या करण्यात आली असावी असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं.
मात्र, पोलिसांनी जेव्हा नेमका तपास सुरू केला तेव्हा आरोपी दुसरं-तिसरं कोणी नसून मृत महिलेचा नवरा आणि त्याची मावशीच असलयाचं समोर आलं होतं. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, दागिने आणि 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी पती आणि त्याच्या मावशीचे तब्बल 12 वर्षांपासून अवैध संबंध होते. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी पती संतोष कुमार साहू आणि त्याची मावशी शांती यांच्यात गेल्या 12 वर्षांपासून अवैध संबंध होते. लग्नानंतर सोनी उर्फ संतोषी ही दोघांमध्ये अडसर ठरत होती. पण खुद्द शांतीनेच संतोषचे लग्न हे सोनी उर्फ संतोषीसोबत लावून दिलं होतं.
5 मे रोजी सकाळी संतोष ऑफिसला निघून गेल्यानंतर शांती आणि संतोषीमध्ये भांडण झालं होतं. याच भांडणाला वैतागून संतोषीने घरात ठेवलेले विषारी औषध प्राशन केलं. त्यामुळे संतोषीच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तिचे अंग थंड पडू लागलं होतं.
केबल वायरने दाबला गळा
यानंतर शांतीने संतोषीला बाथरूममध्ये नेले आणि तिच्या डोक्यावर पाणी टाकून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या संतोषी शुद्धीत येत नव्हती त्यामुळे शांतीने संतोषीचा केबल वायरने गळा आवळून खून केला.
त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शांतीने घरातील कपाटाचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम काढून घेतली. घरातून बाहेर पडून बॅग घेऊन जाताना ती अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना अनेक सीसीटीव्हीमध्ये शांती दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत हुशारीने या प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी यावेळी शांतीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. सुरुवातीला ती पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत होती. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.
दुसरीकडे हुंडा हत्येप्रकरणी आरोपी पतीलाही अटक करण्यात आली आहे. खून केलेल्या मावशीसह संतोष आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ करत असल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं.