अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या 8 तरुणांनी अल्पवयीन मुलीवर आधी माहीममधील एका निर्जन बंगल्यावर नेऊन अत्याचार केले. त्यानंतर समुद्रकिनारी नेऊन पुन्हा आळीपाळीने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं पोलीस प्रशासनही हादरलं आहे. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केलीये.
16 वर्षाच्या मुलीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं पालघर जिल्हा हादरला आहे. बलात्कार पीडित अल्पवयीन मुलगी माहीम भागात राहते. शुक्रवारी आणि शनिवार रात्रीच्या दरम्यान आरोपींनी मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलीने 16 डिसेंबरच्या रात्री झालेल्या अत्याचारानंतर पोलिसांत तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडितेनं फिर्यादीमध्ये तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितलीये.
पीडितेने फिर्यादी दिलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर रोजी आरोपी अल्पवयीन मुलीला माहीम गावातील एका निर्जन बंगल्यावर घेऊन गेले. रात्री 8 वाजता बंगल्यावर गेल्यानंतर आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
बंगल्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपी पीडित मुलीला माहीम बीचवर घेऊन गेले. त्यानंतर तिथेही आरोपींनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. 16 डिसेंबरच्या रात्री 8 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 8 जणांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
सामूहिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह आयपीसी 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 366 (अ) (अल्पवयीन मुलीची खरेदी करणे), कलम 341, कलम 342, 323 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. याप्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.