प्रेमसंबंधातून काढला मुलीच्या वडिलांचा काटा; नागपुरातील द्विवेदी हत्या प्रकरणाचा असा झाला खुलासा

नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेमसंबंध होते.
Nagpur Crime
Nagpur Crime

योगेश पांडे, नागरपूर, प्रतिनिधी

नागपूर: नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली, त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे.

रविवारी (काल) सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जवळच नारायण द्विवेदी यांची भर रस्त्यात हत्या झाली होती. नारायण यांची हत्या मृतकाच्या जुन्या घर मालकाच्या 20 वर्षीय मुलानेच केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलराम पांडे या घर मालकाचा मुलाला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचे आरोपीचे नारायण द्विवेदींच्या मुली सोबत प्रेमसंबंध

आरोपी बलराम पांडेचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचा पाठलाग करायचा, छेड काढायचा याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळेला बालरामला समजावले होते. त्यांनी बालरामच्या वडिलांना ही माहिती दिली होती. बलरामच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबाने पांडे यांचे घर सोडून जाण्याचा निर्धार केला.

घर बदलल्याच्या रागातून केली बलराम पांडेने केली हत्या

नारायण द्विवेदी कुटुंबाने पांडे यांचे घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले. तरी ही तीन दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबीयांनी घर बदलवले. दुसरीकडे राहायला गेल्यावर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच आरोपी बलरामने नारायण द्विवेदी यांना दिली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काल सकाळी नारायण द्विवेदी आपल्या कामावर जाण्यासाठी दुचाकीने घरातून निघाले.

तेव्हापासून बलराम त्यांचा पाठलाग करत होता. ते गिट्टीखदान परिसरात गुन्हे शाखेच्या जवळून जात असताना बलरामने त्यांना अडविले आणि त्यांच्यासोबत वाद उकरून काढत प्राणघातक हल्ला केला. आरोपीने चाकूने नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरच कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याला गोरेवाडा परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी द्विवेदी कुटुंबियांकडून त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपीकडून छेडखानी केली जात असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती असा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in