
पत्नीला साडी नेसता येत नाही म्हणून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, ती माझ्यापेक्षा वयाने पाच वर्षे मोठी आहे. I quit असं स्टेटस ठेवून २४ वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केली आहे. अजय समाधान साबळे असं या तरूणाचं नाव आहे.
औरंगाबादमधल्या राजनगर भागात आई-वडिलांनासोबत राहणारा अजय प्लंबर म्हणून काम करत त्याचा उदरनिर्वाह करत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या मोबाईलवर 'आय क्वीट' असे स्टेटस् ठेवला. त्यामुळे हे स्टेट्स पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला. तो त्याच्या खोलीत गेला असता अजयने गळफास घेतल्याचं त्याला दिसून आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अजयला रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
काय लिहलंय सुसाईड नोटमध्ये?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तेथेही ती जेवणानंतर स्वतःच्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते. असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मात्र या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पत्नीला साडी नेसता येत नाही, जेवण बनवता येत नाही ती पाच वर्षांनी मोठी आहे ही कारणं लिहून या तरूणाने आत्महत्या केल्याने सध्या या घटनेची चर्चा औरंगाबादमध्ये आहे. तसंच सोशल मीडिायवरही या घटनेची आणि या तरूणाने आत्महत्येच्या आधी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटची चर्चा रंगली आहे.