
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' च्या सेटवर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवारी) घडली. मेकअप रूममध्ये तिने गळफास घेऊन अवघ्या 20 व्या वर्षी तिनं आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणात खुनाचाही संशय आला आहे. त्यामुळे सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाणार असल्याचं वळीव पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना तुनिषाच्या मित्रांवर संशय आहे. फ्री प्रेस जनरलने दिलेल्या बातमीनुसार, तुनिषा मागील काही दिवसांपासून तणावात दिसत होती. पोलिसांमधील सुत्रांनी वर्तविलेल्या दाव्यानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिला तिच्या मित्राने लग्नाला नकार दिला होता. हेच तिच्या मृत्यूमागील कारणंही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
तुनिषा शर्माने अवघ्या 20 व्या वर्षी नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखं मिळवली होती. टीव्ही मालिका 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल' आणि कतरिना कैफच्या फितूर चित्रपटानंतर तुनिषा शर्मा प्रकाशझोतात आली. सध्या तुनिशा शर्मा अभिनेता शिवीन नारंगसोबत एका म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करत होती.
तुनिषाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अवघ्या 14 व्या वर्षी तिची 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेसाठी निवड झाली होती. यात तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तुनिषाने चक्रवर्ती अशोक सम्राट या TV मालिकेत राजकुमारीची भूमिकाही साकारली होती. यासोबतच 'गब्बर पुंचवाला', 'शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभानल्लाह' या चित्रपटात भूमिका केल्या. तसंच 'बार बार देखो', 'कहानी 2' आणि 'दबंग 3' या चित्रपटांमध्येही तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या.