Lok Sabha live : "सुनील तटकरे हे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ"
Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील सर्व घटनांचे ताजे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Lok Sabha Elections 2024 Maharashtra live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून, राजकीय समीकरणे सातत्याने बदलताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रत्येक मतदारसंघात बेरजेचं राजकारण सुरू असून, दोन्ही आघाड्यांसमोर बंड्याळा उफाळून येण्याचे आव्हान आहे. याबद्दलचे अपडेट वाचा...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 06:22 PM • 28 Mar 2024
Lok Sabha live : "सुनील तटकरे हे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ"
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मोठे राजकीय भाकित केले. "तिकीट वाटप होऊ द्या देशातील चित्र बदलणार आहे. भाजपातून लोक पळतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे", असे विधान जयंत पाटील यांनी केले.
"शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी कामे केली, पण कमी केली आहेत. त्यांची एकच बाजू जमेची आहे ती म्हणजे त्यांच्यावर कसला डाग लागलेला नाही. त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला नाही म्हणून मी नाराज होतो. शेकापला सोडून अनेक जण गेले, आमदार गेले, खासदार गेले परंतू शेकाप मतदार कमी झालेले नाहीत. जे सोडून गेले त्यांची अवस्था इतकी केविलवाणी आहे की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही", असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
- 05:20 PM • 28 Mar 2024
प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा! CBI कडून 'त्या' प्रकरणाचा तपास बंद
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने बंद केला आहे. प्रफुल पटेल हे गेल्या वर्षी अजित पवारांसह महायुतीमध्ये (NDA) सामिल झाले आहेत. UPA मध्ये ते नागरी विमान वाहतूक मंत्री होते, एअर इंडियासाठी विमान व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता, ज्यामुळे सरकारचे 840 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाचा तपास सीबीआयने बंद केला असून त्यांना क्लीन चीट दिली आहे.
- 04:01 PM • 28 Mar 2024
मुख्यमंत्री शिंदे अभिनेता गोविंदाला देणार तिकीट?
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेता गोविंदाला उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता गोविंदा शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचला आहे. त्याचबरोबर करिश्मा कपूर आणि करिना कपूरही शिंदेंच्या भेटीसाठी आल्या आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोविंदाला उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
- 03:31 PM • 28 Mar 2024
दिलीप वळसे पाटील पडले पाय घसरून, गंभीर दुखापत
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुण्यातील घरी पाय घसरून पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ औंध येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
- 03:12 PM • 28 Mar 2024
रश्मी बर्वेंच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार
रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे. जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीसही जारी केली आहे. या नोटीशीला बर्वे यांनी हायकोर्टात आव्हान दिल् आहे.
जिल्हा जातपडताळणी समिती द्वारे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात निर्णयावर स्थगित देण्याची मागणी केलेली आहे. मात्र रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सुनावणी सोमवारी होणार आहे.
- 02:07 PM • 28 Mar 2024
Shiv Sena Candidates : गोडसेंचा पत्ता कट होणार, शिंदे 'या' नेत्यांना देणार लोकसभेचे तिकीट?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आज जाहीर होणार आहे. आमदार संजय राठोड यांनी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडून विद्ममान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाणार असे सांगितले जात आहे. या मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणूक लढवणार, असे म्हटले जात आहे.
शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी
1) रामटेक - राजू पारवे (उमेदवारी अर्ज भरला आहे.)
2) बुलढाणा - संजय जाधव
3) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी किंवा संजय राठोड
4) हिंगोली - हेमंत पाटील
5) कोल्हापूर - संजय मंडलिक किंवा समरजीत घाटगे (भाजप)
6) हातकंणगले - धैर्यशील माने
7) औरंगाबाद - बाकी (दानवेसाठी प्रयत्न सुरु आहे)
8) मावळ - श्रीरंग बारणे
9) शिर्डी - सदाशिव लोखंडे
10) पालघर - राजेद्र गावित
11) कल्याण - श्रीकांत शिंदे
12) ठाणे - बाकी (प्रताप सरनाईक आणि रवी फाटक)
13) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
14) उत्तर पश्चिम - (कलाकारांची चाचपणी सुरु) - 12:31 PM • 28 Mar 2024
Ramtek Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसला रामटेकमध्ये झटका! रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढताना दिसत आहे. काँग्रेसने अनुसूचीत जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. पण, आता त्यांचे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आले आहे. हे प्रकरण समितीकडे गेल्यानंतर बर्वे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होण्याआधीच समितीने हा निर्णय दिला आहे.
- 11:24 AM • 28 Mar 2024
'न्यायव्यवस्थेवर एका विशिष्ट गटाचा...', सरन्यायाधीशांना 600 वकिलांचे खळबळजनक पत्र
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सगळीकडे निवडणुकीची चर्चा होत असताना ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि पिंकी आनंद यांच्यासह देशातील 600 हून अधिक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. या पत्राने खळबळ उडाली आहे. देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात एक विशेष गट गुंतला आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
या वकिलांनी पत्रात लिहिले आहे की, या विशेष गटाचे काम न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी दबाव आणणे आहे, विशेषत: अशा प्रकरणांमध्ये ज्यात राजकारणी गुंतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्या कारवाया देशाच्या लोकशाही जडणघडणीला आणि न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वासाला धोका निर्माण करणाऱ्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.
वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे व्यतिरिक्त ज्यांनी CJI ला पत्र लिहिले त्यात मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होला, स्वरूपमा चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
काय म्हणाले वकिलांनी पत्रात?
वकिलांचे म्हणणे आहे की, हा विशिष्ट गट न्यायव्यवस्थेच्या तथाकथित सुवर्णकाळाबद्दल खोटे कथन सादर करण्यापासून ते न्यायालयांच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि न्यायालयावरील जनतेच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत अनेक प्रकारे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
हा गट आपल्या राजकीय अजेंड्यावर आधारित न्यायालयाच्या निर्णयांची प्रशंसा किंवा टीका करतो, असे या पत्रात म्हटले आहे. वास्तविक हा गट 'माय वे या हायवे' अशा पद्धतीवर विश्वास ठेवतो. याशिवाय बेंच फिक्सिंगचा सिद्धांतही त्यांनी मांडला होता.
- 10:20 AM • 28 Mar 2024
Maha Vikas Aghadi News : काँग्रेस-शिवसेनेतील वाद आज मिटणार?
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले. यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे. या महाविकास आघाडीतील वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला असून, आज महाविकास आघाडीची ४ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीबद्दल खासदार संजय राऊत यांनीही माहिती दिली.
- 10:03 AM • 28 Mar 2024
Lok Sabha Elections 2024 : अनिल देसाई यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटे यांना समन्स बजावले आहे. ईडीने आज ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
अनिल देसाई यांना ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे नेते खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT