Lok Sabha Election Maharashtra Live : संजय निरूपम शिवसेनेत प्रवेश करणार- एकनाथ शिंदे
Maharashtra Lok Sabha Election Live Updates : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण तापले आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे.
ADVERTISEMENT
विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना लक्ष करताना दिसत असून, धार्मिक धुव्रीकरण आणि संविधान बदलाचा मुद्दा प्रचारात गाजत आहे.
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, यात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेले मतदारसंघही यात आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे दररोज राजकीय समीकरणे बदलत आहे. यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी वाचा लाईव्ह अपडेट्स (Maharashtra Lok Sabha election 2024 Latest Updates)
ADVERTISEMENT
- 05:48 PM • 01 May 2024
संजय निरूपम शिवसेनेत प्रवेश करणार- एकनाथ शिंदे
संजय निरूपम यांनी आज आमची सदिच्छा भेट घेतली होती. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच मुंबईतील सहाही जागा आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळे आम्ही विजयाचा षटकार मारणार असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतही सभा होणार आहे, असे शिदेंनी म्हटले आहे.
- 04:42 PM • 01 May 2024
संजय निरूपम शिंदेंच्या सोबत, शिवसेनेच्या बैठकीला उपस्थिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात शिवसेनेची बैठक सूरू आहे. या बैठकीला संजय निरुपम यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे संजय निरूपम एकनाथ शिंदेंसोबत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
संजय निरूपम यांनी काहीच दिवसापुर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यानंतर आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतच निरूपम यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे कोणताही पक्षप्रवेश न करता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शवल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवय्या उंचावल्या आहेत.
- 04:14 PM • 01 May 2024
Lok Sabha Election : महायुतीत अजित पवारांपेक्षा शिंदे ठरले भारी!
महायुतीतील तीन पक्षाचं जागावाटप निश्चित झालं आहे. या जागावाटपातून अजित पवारांपेक्षा अजित पवार वरचढ ठरल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ९ ते १० जागा मिळतील अशी चर्चा होती. पण, शिंदेंनी जागावाटपात बाजी मारली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ६ जागा आल्या आहेत. यातील एक जागा महाराष्ट्राबाहेरची आहे. तर एक जागा रासपच्या महादेव जानकर यांना द्यावी लागली आहे. त्यामुळे अजित पवारांना राज्यात चारच जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे युतीमध्ये भाजपने २५ जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजपला तीन जागा जास्त मिळाल्या आहेत.
- 03:59 PM • 01 May 2024
योगी आदित्यनाथांचा राम मंदिरावरून काँग्रेसवर हल्ला
अयोध्येत प्रभू रामाचं मंदिर काँग्रेस बनवू शकल असती का? यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा होती का? काँग्रेसची लोक काय म्हणायचे, राम झालेच नाही. राम मंदिराचा निर्णय झाला तर रक्ताच्या नदी वाहतील. तेव्हा मी सांगितलं मी आहे युपीमध्ये रक्ताच्या नदी नाही एक मच्छर देखील मरणार नाही. ही तीच काँग्रेस आहे जिने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता, अशा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर केला होता.
- 11:32 AM • 01 May 2024
Thane Lok Sabha Update : तिकीट मिळताच म्हस्केंनी राजन विचारेंवर चढवला हल्ला
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशाने आणि पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी मिळाली आहे. ठाण्यातील सर्वच शिवसेना भाजप आणि मनसे या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे कृपा आशीर्वाद माझ्यावर असून, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी खरा करेन", अशी पहिली प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली आहे.
"कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिली, हे फक्त शिवसेनेत होऊ शकते. या संधीच मी सोन करण्याचा प्रयत्न करेन. एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेशी प्रामाणिक राहीन", असे ते म्हणाले.
"प्रचाराला दिवस कमी असले तरी आम्ही आणि कार्यकर्ते कायमच लोकांची काम करत असतो. त्यांनी केलेल्या या कामाची मला पोच पावती मिळेल. आमचेही काही मेळावे ठाण्यात झालेले आहेत. आमचे काम ३६५ दिवस सुरू असते. त्यामुळे भीती वाटत नाही", असे नरेश म्हस्के म्हणाले.
"आम्ही ज्या दिवशी अर्ज भरू त्यादिवशी काय गर्दी असते ते समजेल. निष्ठावंत कोण ज्यांनी बाळासाहेबांची भूमिका खुंटीला टांगली, ते निष्ठावंत कसे असू शकतात? लोकांनी पाहिलेले आहे राजन विचारे खासदार असून कोरोना काळात घरी बसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून काम करत होते. त्यामुळे ठाण्यातील जनतेला कोण कसं आहे, माहीत आहे. याचं उत्तर येत्या २० तारखेला मिळेल", असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
- 09:23 AM • 01 May 2024
Maharashtra day wishes : पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीमध्ये ट्विट करत मोदींनी म्हटले आहे की, "महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे."
"परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा", असे मोदी यांनी म्हटले आहे.
- 09:00 AM • 01 May 2024
Nashik Lok Sabha News : भाजपने सोडला नाशिकच्या जागेवरील दावा, पण...
Nashik Lok Sabha election Updates : महाविकास आघाडीने जागावाटप करून आणि सर्व उमेदवार जाहीर केले, तरीही महायुतीच्या जागावाटपाचे घोडे पुढे सरकताना दिसत नाहीये.
दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटले असले, तरी नाशिक, ठाण्याचा तिढा कायम आहे. यात नाशिकच्या जागेचा निर्णय आज होणार आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दल माहिती दिली.
भाजपने घेतली माघार
नाशिकच्या जागेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. पण, आता भाजपने माघार घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी (३० एप्रिल) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भाजपने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह सोडलेला आहे. नाशिकच्या जागेचा निर्णय एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसून ठरवतील. ही जागा त्या दोघांनी बसून ठरवायची आहे", असे बावनकुळे यांनी सांगितले.
भुजबळांचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
छगन भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या माघारीमुळे ओबीसी समाज नाराज असल्याची चर्चा आहे. याचा फटका बसू नये म्हणून भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी भुजबळ यांची भेट घेतली. ही भेट त्यांची नाराजी दूर करण्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, १ मे रोजी महायुतीकडून नाशिकच्या जागेची घोषणा केली जाणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या भेटीनंतर दिली.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे हे स्पर्धेत आहेत. शांतिगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. त्यांना एबी फॉर्म अद्याप मिळालेला नाही. ते माघार घेणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय करंजकर हेही उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. महायुती उमेदवार जाहीर करताना धक्का देऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे नाशिकची जागा कुणाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार हे प्रश्न आज निकाली लागणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT