Maharashtra Lok Sabha Live : 'श्रीकांत शिंदेंचं खासदार झाल्याबद्दल अभिनंदन', राष्ट्रवादीच्या नेत्याने लावला बॅनर
Maharashtra Lok Sabha Live Updates : महाराष्ट्र आणि देशातील लोकसभा निवडणुकीचे अपडेट्स, महत्त्वाच्या बातम्याच्या लाईव्ह अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live update : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. ४ जून रोजी दुपारपर्यंत देशात कुणाचे सरकार येणार आणि कोण विरोधी बाकावर बसणार, हे स्पष्ट झालेलं असेल.
ADVERTISEMENT
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशात सत्ताकारणाच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. देशात अनेक संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपचे सरकार येईल असे दावे केले आहेत. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज निकालात खरे ठरणार का? याबद्दलही उत्सुकता आहे.
दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते दावा करत आहेत की, त्यांचे सरकार येणार आहे. इंडिया आघाडीला देशभरात 295 जागा मिळत आहेत, असा दावा विरोधी नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांचे दावे खरे आहेत की, खोटे हेही निकालातून स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ आल्याने उमेदवारांपासून नेत्यांच्या धडधड वाढली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व महत्त्वाचे लाईव्ह अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
- 04:53 PM • 03 Jun 2024
Lok Sabha Election : डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने झळकावला श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा बॅनर
लोकसभा निवडणुकांचा अंतिम निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक असताना कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीत कोपर पुलाजवळ शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुरेश जोशी यांनी हा बॅनर लावलाय. श्रीकांत शिंदे यांची प्रचंड बहुमताने खासदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात निकालाची मोठी उत्सुकता आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना देखील लागली आहे. अंतिम निकाल लागण्यास आता काही तास अवकाश असतानाच श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहे. हा बॅनर सध्या साऱ्यांचे लक्ष वेधत असून त्यामुळे अनेक चर्चानाही उधाण आले आहे.
- 02:33 PM • 03 Jun 2024
Baramati Lok Sabha : "सुनेत्रा पवार 1 लाख मतांनी जिंकणार"
बारामती लोकसभा मतदारसंघावर सर्वांचीच नजर आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी होतील, असे अंदाज एक्झिट पोलचे आहेत. पण, एका स्थानिक नेत्यांने सुनेत्रा पवार १ लाख मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले की, "सुनेत्रा पवार यांना बारामतीत मोठी आघाडी मिळेल. इंदापूर, दौंड, खडकवासला इथेही आघाडी मिळेल. त्याबरोबर पुरंदर, भोर विधानसभा मतदारसंघातही लीड मिळेल."
"बारामती विधानसभा मतदारसंघात ५० हजारांपेक्षा जास्त लीड सुनेत्रा पवार यांना मिळेल. सुनेत्रा पवार १ लाख मताधिक्याने विजयी होतील", असा दावा होळकर यांनी केला आहे.
- 08:56 AM • 03 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 : कोणत्या मतदारसंघातून कोण जिंकतंय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल वेगवेगळ्या एक्झिट पोलने निरनिराळे अंदाज मांडले आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या जागा घटण्याचा अंदाज आहे. मात्र, 48 मतदारसंघाचे निकाल कसे लागू शकतात, याबद्दल India Today - Axis My India Exit Poll काय म्हणतोय, ते बघा
1. नंदूरबार - हिना गावित (भाजप)
2. दिंडोरी - भारती पवार (भाजप)
3. जळगाव - स्मिता वाघ (भाजप)
4. धुळे - सुभाष भामरे (भाजप)
5. रावेर - रक्षा खडसे (भाजप)
6. नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
7. शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट)
8. अहमदनगर - सुजय विखे (भाजप)
9. हिंगोली - बाबूराव कदम-कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)
10. कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
11. ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
12. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
13. मावळ - संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट)
14. यवतमाळ - संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
15. छ. संभाजीनगर - संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
16. हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)
17. लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप)
18. धाराशिव - ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
19. परभणी - संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट)
20. बीड - पंकजा मुंडे (भाजप)
21. नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
22. जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
23. मुंबई उत्तर - पियूष गोयल (भाजप)
24. मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप)
25. मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
26. मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
27. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
28. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
29. नागपूर - नितीन गडकरी (भाजप)
30. अमरावती - नवनीत राणा (भाजप)
31. अकोला - अनुप धोत्रे (भाजप)
32. वर्धा - रामदास तडस (भाजप)
33. गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप)
34. रामटेक - अशोक पारवे (शिवसेना शिंदे गट)
35. चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
36. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप)
37. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
38. पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप)
39. सांगली - विशाल पाटील (अपक्ष)
40. शिरूर - अमोल कोल्हे (NCP शरद पवार)
41. बारामती - सुप्रिया सुळे (NCP शरद पवार)
42. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
43. कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट)
44. सोलापूर - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
45. रायगड - सुनील तटकरे (NCP अजित पवार)
46. भिवंडी - सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार)
47. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप)
48. पालघर - हेमंत सावरा (भाजप)
- 08:36 AM • 03 Jun 2024
Sangli Lok Sabha Update : निकालाआधीच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जुंपली आहे. याला कारण ठरले आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोलचा अंदाज!
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
आता समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार विशाल पाटील हे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव करू शकतात. या एक्झिट पोलची चर्चा होत असून, संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
"सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल नंतर मी बोलणारच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. आम्ही इथे गोट्या खेळायला बसलेलो नाही. आमचे सुद्धा पूर्ण आयुष्य राजकारणात गेले आहे", असे राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी केलेल्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी जास्त बोलणार नाही. राऊत ज्या शाळेत शिकले, ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्यांच्या गावात पिण्याचे पाणी, दवाखाना, त्यांचा जन्म ज्या दवाखान्यात झाला तो काँग्रेसने निर्माण केला."
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यामुळे मी त्याच्यावर का प्रतिक्रिया का देऊ? संजय राऊत अतिविद्वान आहेत. ते कालच लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे तिथून जास्त काय शिकून आले ते माहिती नाही", असा टोला पटोले यांनी राऊतांना लगावला.
सांगलीच्या निकालापूर्वीच ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली असून, निकालानंतर काय होणार, याचा हा ट्रेलर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
- 08:21 AM • 03 Jun 2024
Maharashtra Lok Sabha Updates : महायुतीचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही -खडसे
शरद पवार यांच्य राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे येतील याबद्दल एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला फटका बसताना दिसत आहे.
यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त येत असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. याचा अर्थ महायुतीच्या माध्यमातून झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचलेले नाही."
"कापूस व सोयाबीनला दर न मिळणे, या कारणामुळे महायुतीच्या जागा कमी येत असल्याचे दिसत आहे", असेही एकनाथ खडसे म्हणाले.
शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले आहे. त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचारही केला. मात्र, निकालाच्या आधी महायुतीवर आगपाखड केल्याने ते पुन्हा यू टर्न घेतात की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT